नवी मुंबई : ठाणे जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी संपवण्याचे काम नाईक यांनी केले असून पालिकेतील भ्रष्टाचार आणि खंडणीला ते कारणीभूत असल्याचा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपाला
नाईक यांनी प्रतिउत्तर दिले असून माझ्यावर आरोप करण्याची पात्रता नसल्याचे म्हटले आहे. या वेळी नाईक यांनी आव्हाड यांचा वडिलांचा उल्लेख करून प्रचाराची पातळी घसरणार असल्याचे संकेत दिले आहेत.
नवी मुंबई पालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. ‘मविआ’ विरुद्ध भाजप अशी लढत होणार असल्याचे दिसू लागले आहे. त्यामुळे ‘मविआ’तील घटक पक्षांनीही भाजपच्या फलकनाम्याला उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात आव्हाड यांनी नाईक यांनी ठाणे जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी संपवण्याचे काम केल्याचा गंभीर आरोप केला. राष्ट्रवादीबरोबरच आपल्यालाही ते संपवणार होते, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर पालिकेतील भ्रष्टाचार आणि खंडणीला नाईक कुटुंब जबाबदार असल्याचेही ते म्हणाले. आव्हाड यांची ही बोचरी टीका नाईक यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यांनी नेरुळ येथील एका कार्यक्रमात या टीकेला जोरदार उत्तर दिले आहे.
माझ्यावर टीका करण्याची पात्रता तुझी नाही, अशा शब्दांत नाईक यांनी त्याला उत्तर दिले असून आपण राष्ट्रवादी का सोडल्याचे अध्यक्ष शरद पवार यांना माहीत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे नेते आपल्यावर आरोप करणार असतील तर त्याला जशास तसे उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नाईक यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्यावर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी आरोप केले होते; पण त्याला नाईकांनी उत्तर देण्याचे टाळले होते. त्यामुळे दिवंगत बाळासाहेबांवर टीका न करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा झाली होती, मात्र या वेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना जशास
तसे उत्तर देण्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत काय सुरू आहे आणि आपण पक्ष का सोडला
याचे खरे उत्तर दिल्यास मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पवार यांनी सांगितल्यास आपण बोलणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. नाईक आणि आव्हाड यांच्यामध्ये चांगलाच सामना रंगणार असून येत्या काळात हा कलगीतुरा नवी मुंबईकरांना पाहण्यास मिळणार आहे.