नवी मुंबई: महाराष्ट्र राज्य भाजप उपाध्यक्ष यांच्या पत्नीची जमीन खरेदी व्यवहारात २ कोटी ४८ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी १३ जणांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. केसरीनाथ पाटील, बाळू पाटील, दिगंबर पाटील , उपेंद्र पाटील, सविता घरत, वनिता भोपी, कविता पाटील, करुणा भोईर, अविनाश उलवेकर, रुपेश उलवेकर, दीपक, उलवेकर, देवयानी पाटील असे संशयित आरोपींची नावे आहेत. सुदर्शना अनिल कौशिक असे यातील फिर्यादी यांचे नाव आहे. त्यांनी सेक्टर २३ उलवे येथे २ हजार ४५० चौरस मीटरचा भूखंड क्रमांक १४४ हा विकत घेतला होता.
यासाठी भूखंड मालक आणि वारसदार यांना २ कोटी ४८ लाख ६६ हजार रुपये देण्यात आले होते. हा व्यवहार २००३ मध्ये झाला होता. हा भूखंड जागा मालक यांची जमीन सिडकोने संपादित केल्याचा मोबदला म्हणून साडे बारा टक्के योजनेंतर्गत त्यांना सिडकोने दिला होता. यांना मात्र अद्याप हा भूखंड कौशिक यांना हस्तांतरित करण्यात आला नाही. याबाबत भूखंड मालक आणि वारसदार यांना अनेकदा भूखंड हस्तांतरण प्रक्रिया करण्यातही विनंती अनेकदा करण्यात आली होती. .शेवटी भूखंड द्यायचा नसेल तर घेतलेले पैसे द्या म्हणून मागणी करण्यात आली मात्र त्यांनी टाळाटाळ सुरु ठेवले त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री फिर्यादी यांना झाली. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात संशयित आरोपींच्या विरोधात फिर्यादी यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता. त्याची शहानिशा करून संशयित आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.