scorecardresearch

नवी मुंबईत राहुल गांधींविरोधात भाजपाचे आंदोलन, ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा आरोप

मोदी या आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपाकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात शनिवार वाशी येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

BJP protest Navi Mumbai
नवी मुंबईत राहुल गांधींविरोधात भाजपाचे आंदोलन, ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा आरोप (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

नवी मुंबई : मोदी या आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपाकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात शनिवार वाशी येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भाष्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने कोणत्या कारणाबद्दल दोषी ठरवले आहे, याबद्दल काहीच बोलत नसल्याबद्दल नवी मुंबई भाजपा अध्यक्ष रामचंद्र घरत यांनी आश्चर्य व्यक्त केले. सदर आंदोलन आज वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘मोदी’ या आडनावावरून अपमानास्पद टिप्पणी करताना ओबीसी समाजाचा आणि या समाजाचा भाग असलेल्या तेली समाजबांधवांचा अपमान केला. न्यायालयाने याबद्दल राहुल गांधींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी हे आपल्या घराण्यामुळे आलेल्या राजेशाही मानसिकतेतून बाहेर पडले नाहीत, असेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसते. न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याऐवजी काँग्रेस नेते रस्त्यावर आंदोलने करून न्यायालयाचा व  संविधानाचा अपमान करत आहेत. काँग्रेस नेत्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल भाजपा न्यायालयात दाद मागेल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – नवी मुंबईत अनधिकृत दर्गा असल्याचा मनसेचा दावा; कारवाई न केल्यास गणपती मंदिर उभारण्याचा इशारा

सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय असते, असे वक्तव्य राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील प्रचारसभेत बोलताना केले होते. मोदी या आडनावाच्या अनेक व्यक्ती क्रीडापटू आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनिअर आहेत, व्यावसायिक आहेत. एखाद्या आडनावाशी संबंधित लोकांचा एखादी व्यक्ती जाहीर सभेत अपमान करत असेल तर त्या विशिष्ट आडनावाच्या व्यक्तींना मानहानीचा दावा दाखल करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे, असा दावा घरत यांनी केला. 

हेही वाचा – नवी मुंबई : बंटी-बबलीला अटक; भांडण उकरून चीज वस्तूंची करत होते चोरी 

यावेळी भाजपा अध्यक्ष रामचंद्र घरत, युवक अध्यक्ष दत्ता घंगाळे, युवती अध्यक्षा सुहासिनी नायडू, महामंत्री सतीश निकम, तसेच महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 23:37 IST

संबंधित बातम्या