नवी मुंबई : गुडीपाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीम येथील अनधिकृत दर्गाबाबत आवाज उठवला होता. या दर्ग्यावर कारवाई करा, अन्यथा दर्गा परिसरात गणपती मंदिर बांधू, असा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी दर्गावर कारवाई करण्यात आली. या पाठोपाठ सांगली, पनवेल, मुंब्रा येथील अनधिकृत दर्गाबाबत असेच इशारे स्थानिक मनसेने दिले. नवी मुंबईतही अनधिकृत दर्गा असल्याचा दावा मनसेने केला आहे.

हेही वाचा – शीव-पनवेल मार्गावर मार्गिका पट्टे नसल्याने छोट्या अपघातात वाढ 

हेही वाचा – गृहिणींना दिलासा; लसूण झाले स्वस्त, घाऊक बाजारात प्रतिकिलो १५ ते २० रुपयांची घसरण

सांगली येथील दर्गावर कारवाईचे सूत्र हलले. हे घडत असतानाच मनसे प्रवक्ते व नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनी नवी मुंबईतील पाम बीच लगत खाडी किनाऱ्यावरील दर्गाचा मुद्दा उचलून धरला. पामबीच मार्गावर मरीन नेव्ही युनिव्हर्सिटी असलेल्या चाणक्य इमारतीला लागूनच अतिक्रमण करून दर्गा उभारण्यात आला आहे, शेजारी कांदळवन आणि समुद्रकिनारा आहे आणि भाभा अणुसंशोधन केंद्र येथून नजरेच्या टप्प्यात आहे. मुळातच हा संपूर्ण परिसर सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आहे. तसेच हा दर्गा अनधिकृत असून मोठी जागाही बळकावलेली आहे, असा दावा काळे यांनी केला आहे. या दर्ग्यावर कारवाई करण्याची विनंती त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी, नवी मुंबई मनपा, कांदळवन विभागाला केली आहे. कारवाई झाली नाही तर गणपती बाप्पाचे मंदिर उभे करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.