नवी मुंबई : सिडको मध्ये कार्यरत असणारा लघु लेखक नरेंद्र हिरे याला दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. यातील फिर्यादी हे सिडकोचे कर्मचारी होते. निवृत्त झाल्या नंतर त्यांच्या हक्काची रक्कम त्यांना सिडको कडून मिळणार होती. हि रक्कम मंजूर करण्यासाठी साडे चार लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. हि कारवाई ठाणे लाचलुचपत विभागाने केली.
सिडको मध्ये कार्यरत असणारे एक कर्मचारी काही महिन्यापूर्वी निवृत्त झाले. निवृत्त झाल्या नंतर देयके व्याजासह रक्कम व उपदानाची रक्कम अदा करणे बाकी होते. हि हक्काची रक्कम मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यात लघु लेखक नरेंद्र हिरे यांनी व्यवस्थापकीय कार्मिक प्रदमा बिडवे, यांच्या साठी तीन लाख व तक्रारदार यांची पगाराची रक्कम अदा करण्यासाठी तसेच विभागीय चौकशीत दोषमुक्त केल्याचा मोबदला म्हणून विभागीय चौकशी अधिकारी चंदलाल मेश्राम यांच्या साठी १ लाख रुपये आणि स्वतःसाठी ५० हजार रुपये असे एकूण ४ लाख ५० हजार रुपयांची मागणी हिरे यांनी केली अशी तक्रार लाच लुचपत विभागाला प्राप्त झाली होती.
या माहितीची पडताळणी केली असता विभागीय चौकशी अधिकारी यांच्यासाठी एक लाख आणि स्वतःसाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपत अधिकाऱ्यांनी २० तारखेला सापळा रचला . यात हिरे हा तक्रारदार कडून दीड लाख रुपये घेत असताना त्यात अडकला. या प्रक्ररणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.