नवी मुंबई: नवी मुंबई भाजप नेते अनिल कौशिक यांना जमीन खरेदी व्यवहारात तब्बल १ कोटी ४७ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी त्यांनी फसवणूक करणाऱ्या २९ संशयित आरोपींच्या विरोधात दिलेल्या तक्रारी वरून वाशी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. बेबी कोळी. किशोर कोळी, सुखदेव कोळी, विकी कोळी. येसूबाई कोळी, विश्रांती कोळी, द्रौपदी कोळी, सखू कोळी, चॊथु कोळी, सुरज कोळी, सर्वेश कोळी, हरी कोळी, कमलाकर कोळी, शंकर कोळी, गजानन कोळी, मच्छिन्द्र कोळी, माधुरी चाळक , अनुसया चाळके, रेश्मा कोळी, सुनीता कोळी, मयुरेश कोळी, श्रुती कोळी असे यातील संशयित आरोपींची नावे आहेत.
यातील फिर्यादी अनिल कौशिक यांची के एस होम्स नावाची कंपनी असून वाशी सेक्टर १७ येथे कार्यालय आहे. यात सुदर्शना कौशिक अशोक शांडिल्य, हे संचालक पैकी आहे. या कंपनी द्वारे त्यांनी उलवा सेक्टर १९ येथे चारशे चौरस मीटरचा भखंड क्रमांक २०३, सेक्टर ३ येथे ३०० चौरस मीटरचा भूखंड क्रमांक ८७, आणि सेक्टर १७ येथील ७०० चौरस मीटर पैकी ३०५ चौरस मीटरचा भूखंड हे तीन भूखंड विकत घेतले होती. यासाठी एकूण आता पर्यंत १ कोटी ४७ लाख ७५ हजार रुपये धनादेश तसेच रोख असे देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष ताबा घेण्यावेळी सदर भूखंड अन्य कोणाला तरी विकल्याचे समोर आले. हा सर्व प्रकार २७ मार्च २००८ ते ८ मार्च २०२५ च्या दरम्यान घडला आहे. व्यवहार झाला असताना भूखंड ताबा न देता परस्पर तिसऱ्याच व्यक्तीला विकला गेला तसेच देण्यात आलेले पैसेही परत दिले जात नसल्याने फिर्यादी अनिल कौशिक यांनी या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात २६ जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीची शहानिशा करून संशयित आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकट: उलवे परिसरातच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा महत्वाकांक्षी प्रकल्प उभा राहिला असून नुकतेच त्याचा उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले आहे. अटल सागरी सेतू , जेएनपीटी असे अत्यंत महत्वाचे प्रकल्प या भागात असल्याने जमिनीला सोन्याचे भाव आले आहेत. त्यामुळे जमीन खरेदी व्यवहारात फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. एकच भूखंड अनेकांना विकणे, सिडको जमिनीवर अतिक्रमण करून घरे बनवून विकणे , अशा व्हाईट कॉलर गुन्ह्यात वाढ होत आहे. त्यामुळे जमीन खरेदी विक्री व्यवहार सावधतेने करावे असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेने केलेले आहे.