उरण : चिर्ले येथून अटल सेतूवर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांचा प्रवास दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत चालला आहे. त्यामुळे या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. उरण परिसरातील अंतर्गत मार्गाची अवस्था अधिक बिकट आहे. याला विविध आस्थापने जबाबदार असल्याने प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

औद्योगिकीकरणामुळे रस्त्यांचे जाळे पसरलेल्या उरणमधील अनेक मार्गांना खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. उरणमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सिडको, जेएनपीए आदी विभागांच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांचे जाळे पसरले आहे. मात्र, यापैकी अनेक रस्त्यांवर पडलेले खड्डे जीवघेणे ठरत आहेत. तर दुसरीकडे या खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी होत असल्याने चालक, प्रवासी संतापले आहेत.

शहरातील मोरा, कुंभार वाडा रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची केलेली कामे तकलादू असल्याने पुन्हा खड्डे पडले आहेत. तर जेएनपीए, एनएचआय, सार्वजनिक बांधकाम विभाग व सिडकोच्या अखत्यारीत असलेल्या मार्गांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. तसेच चिरनेर, चारफाटा-करंजा, चारपाटा-ओएनजीसी, जासई-गव्हाण, नवघर, जासई द्रोणागिरी आदी परिसरातील रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील हे खड्डे बुजविण्याचे काम दरवर्षी ठेकेदाराकडून केले जाते. यावर्षी गणेशोत्सव खड्ड्यात गेला, आता दिवाळीपूर्वी तरी या मार्गातील खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा प्रवासी व नागरिकांकडून केली जात आहे.