नवी मुंबई  – नवी मुंबईतील नियोजन प्राधिकरण असलेल्या  सिडकोतर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील ३० भूखंडांचा लिलाव जाहीर केला आहे. यामध्ये खारघर येथील आठ बंगला भूखंडांचा समावेश असून, त्यांची विक्रीची सुरुवातीची किंमत तब्बल ४० कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. हे सर्व भूखंड नव्याने उद्घाटन झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे ३० ते ४५ मिनिटांच्या अंतरावर आहेत.

मुंबई राष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी वाहतुकीचा भार हलका होण्यासाठी नवी मुंबई येथे उभारण्यात आलेल्या विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच उद्घाटन केले. मात्र असे असले तरी इतर उर्वरित काम, सुरक्षा नियोजन, यांत्रिक तपासणी असा सर्व बाबी पूर्ण करून डिसेंबर २०२५ पासून येथे व्यावसायिक उड्डाणे सुरू होणे अपेक्षित आहे. शहरात एखादे विमानतळ उभे राहिल्याने येथील घरांच्या, भूखंडाच्या किमतीत ओघाने वाढ ही आलीच. तर विमानतळ परिसरात असलेले भूखंड विकत घेऊन त्यावर व्यावसायिक आणि निवासी बांधकाम करण्यासाठी लहान मोठे विकासक कायम इच्छुक असतात.

याच पार्श्वभूमीवर सिडकोतर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील ३० भूखंडांचा लिलाव जाहीर केला आहे सीआयडीकोने २४ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, या ३० भूखंडांचा ई-लिलाव १६ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणार असून निकाल १७ ऑक्टोबरला जाहीर केले जातील. इच्छुक नागरिकांना अर्ज करण्यासाठी सीआयडीकोच्या eauction.cidcoindia.com या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

भूखंडांचे स्थान आणि प्रकार कोणते ?

या ३० भूखंडांमध्ये ८ भूखंड बंगले बांधण्यासाठी, ८ भूखंड निवासी इमारतींसाठी, ४ भूखंड निवासी आणि व्यापारी अशा मिश्र वापरासाठी, ४ भूखंड केवळ व्यापारी वापरासाठी, तर उर्वरित भूखंड साठवण (वेअरहाऊस) आणि सेवा उद्योगासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

हे भूखंड खारघर, ऐरोली, नेरुळ, द्रोणागिरी, न्यू पनवेल, कोपरखैरणे, सानपाडा आणि कळंबोली या विविध भागांमध्ये स्थित आहेत.

सर्वात महागडा भूखंड कोणता ?

या लिलावात सर्वाधिक दर असलेला भूखंड ४१,९९४ चौ.मी. क्षेत्रफळाचा असून, त्यावर निवासी आणि व्यापारी वापराचे आरक्षण आहे. या भूखंडाची सुरुवातीची राखीव किंमत प्रति चौ.मी. ३.५१ लाख इतकी ठेवण्यात आली आहे. तर खारघरमधील आठ बंगला भूखंड प्रत्येकी ४०० ते ५०० चौ.मी. क्षेत्रफळाचे असून, त्यांची राखीव किंमत प्रति चौ.मी. १.२५ लाख इतकी आहे.