उरण : सिडकोच्या सागरी(कोस्टल)महामार्गावरील खोपटे जंक्शन वरील खड्डेमुक्तीसाठी सिडकोने येथील चौकाचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला असून या कामाची सुरुवातही करण्यात आली असल्याची माहीती सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे खोपटे जंक्शन खड्डेमुक्त होणार आहे. खोपटे जंक्शनच्या कॉक्रीटीकरणाचे काम सुरु असल्यामुळे काही प्रमाणात येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.या जंक्शन वरून जेएनपीटी, द्रोणागिरी, मुंबई, पळस्पे तसेच चिरनेर, खोपटे,पेण अलिबाग येथे जाणारी वाहने ही ये जा करीत आहेत.

अवजड वाहनांमुळे खोपटे जंक्शन वरील अपघाताची संख्या वाढली आहे. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. या संदर्भात अनेकदा बातम्या प्रसिद्ध करून सिडको प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर सिडकोने याची दखल घेत या जंक्शनच्या कामाला सुरुवात केली आहे. पी. पी. खारपाटील खारपाटील कन्स्ट्रक्शन कंपनीकडून हे काँक्रीटीकरणाचे काम करण्यात येत आहे.

सिडकोने प्रवासी आणि नागरिकांच्या मागणीची दखल घेत या जंक्शनच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू केले आहे. मात्र याच मार्गाने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारे मुंबई व नवी मुंबईतील गणेशभक्क्त मुंबई गोवा मार्गाला जोडणाऱ्या सिडकोच्या सागरी मार्गावरून प्रवास करतात. या मार्गावर सद्या प्रचंड प्रमाणात खड्डे पडल्याने या गणेशभक्तांना खड्ड्यातून प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे हे खड्डे गणेशोत्सवा पूर्वी दुरुस्त करावा अशी मागणीही करण्यात येत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील खाजगी वाहनाने प्रवास करणारे वाहन चालक उरणला जोडणाऱ्या नवी मुंबईतील आम्र मार्ग आणि सद्या अटलसेतु मार्गाने खोपटे पूल खारपाडा मार्गे प्रवास करीत आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या वाहनांना जवळपास ५० किलोमीटरचे अंतर कमी होत आहे. या मार्गाने नवी मुंबईतून गव्हाण फाटा उड्डाण पूल मार्गे तर अटलसेतु वरून चिर्ले मार्गे सिडको सागरी महामार्ग असा प्रवास करता येतो. त्यामुळे पनवेल पळस्पे कर्नाळा या मार्गा ऐवजी थेट खारपाडा येथे पोहचता येतो.

त्यामुळे या मार्गाचा वापर गणेशोत्सवात केला जात आहे. मात्र या मार्गावरून जेएनपीए बंदरावर आधारित असलेल्या गोदमातून हजारो जड कंटेनर वाहने ये जा करीत आहेत. या जड वाहनांमुळे या मार्गावर मोठं मोठे खड्डे पडू लागले आहेत. यात येथील खोपटे पूल,द्रोणागिरी नोड आणि भेंडखळ – नवघर गावाकडे जाणाऱ्या चौकात भले मोठे खड्डे पडले आहेत. या चौकातील वळणावरील खड्डे अतिशय धोकादायक बनले आहेत. तर पावसामुळे या खड्ड्याच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. याच मार्गाने उरणच्या पूर्व विभागातील दुचाकीस्वार ही प्रवास करीत आहेत. मात्र जड आणि अधिक लांबीच्या वाहनांमुळे दुचाकीस्वारांचा अपघात होत आहेत. त्याचप्रमाणे या चौकात वाहन नियंत्रण करणारी यंत्रणा नसल्यानेही हा धोका वाढला आहे. या खड्ड्यातील खडेही मोठ्या प्रमाणात इतर वाहनांवर उडू लागले आहेत. या वाढत्या खड्ड्याच्या दुरुस्तीची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

सिडको कडून खोपटे जंक्शनच्या काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हे काम दिवाळी पर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे. त्यामुळे येथे खड्डेमुक्त मार्ग होणार असल्याची तसेच पुढील काळात सागरी मार्गाच्या काँक्रीटीकरणाचेही काम हाती घेण्यात येणार असल्याची माहीती सिडकोचे अधीक्षक अभियंता आर.पी. रेडे यांनी दिली आहे.