नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर २४ तास उलटत नाही तोच गुरुवारी सिडकोने विमानतळाभोवतालच्या परिसरात विकासाची मोठी आखणी हाती घेतल्याने येथील अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारून येथील बांधकामे जमीनदोस्त केली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुढील दिड महिन्यांनी नियमित विमान उड्डाणे होणार असल्याने विमानतळ परिसराचे रूपांतर नियोजनबद्ध आणि आकर्षक करण्याच्या उद्देशाने सिडकोकडून विविध नवे प्रकल्प राबविण्याची तयारी सुरू केली आहे.

या नियोजनात अडथळा ठरत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर सिडकोने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. गुरुवारी विमानतळाच्या पूर्वेस असलेल्या धाकटा खांदा गावात सिडकोच्या बांधकाम नियंत्रण विभागाने कारवाई करत चाळी आणि वीटबांधकामांसह अनेक अनधिकृत संरचना हटवल्या.

या कारवाईदरम्यान गावातील अनधिकृत बांधकाम केलेल्या दोन व्यक्तींना सिडकोने नोटीस बजावले होते. सिडकोकडून पाच किलोमीटरच्या परिसरातील सर्व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याची तयारी आहे, जेणेकरून विमानतळ परिसराचे सौंदर्य आणि सुरक्षितता अबाधित राहील.

विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अटल सेतू मार्ग, गव्हाण फाटा आणि बेलापूर-उलवा मार्गावरील रस्त्यांचे सुशोभीकरण, तसेच रस्त्यालगत हिरव्या नेटशेडची उभारणी करण्यात आली आहे. राज्यभरातून येणाऱ्या मान्यवरांना नियोजनबद्ध व आधुनिक शहराचे दर्शन घडावे, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

सिडकोच्या दक्षता विभागाचे प्रमुख सूरेश मेंगडे यांनी स्पष्ट केले की, विमानतळाभोवतालचा परिसर शिस्तबद्ध व विकासाभिमुख करण्यासाठी ही कारवाई आवश्यक आहे. अनधिकृत बांधकामे केवळ कायद्याचे उल्लंघन नाहीत, तर भविष्यातील विकास आराखड्यालाही बाधा ठरतात. त्यामुळे बांधकाम करण्यापूर्वी आवश्यकत्या परवानग्या घेऊनच बांधकाम करण्याचे आवाहन सिडकोकडून केले जात आहे.