नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र म्हणजे नैना प्रकल्पाला मागील अनेक वर्षात गती मिळाली नव्हती. परंतु सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊनच नैना प्रकल्पाची अंमलबजावणी कऱण्याचा संकल्प केला आहे. नैना प्रकल्पाच्या प्रारुप विकास आराखड्यानुसार रस्त्यांच्या विकासकामांमध्ये बाधित घरांची नेमकी संख्या किती, तसेच या घरांच्या नुकसान भरपाईसाठी कोणते धोरण अंमलात आणावे यासाठी सिडको मंडळात धोरणाची आखणी सुरू आहे.

नैना प्रकल्पामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना मिळालेल्या भूखंड इतर शेतकऱ्यांच्या घरावर असल्याच्या तक्रारींचे सुद्धा सर्वेक्षण या दरम्यान केले जाणार आहे. या सर्वेक्षणाला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आणि सिडकोनेही दोन पावले मागे जाऊन शेतकरीस्नेही धोरण घेतल्यामुळे नैना प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नैना प्रकल्पातील पायाभूत सुविधांच्या जागेवरील (रस्ते व इतर) सर्वेक्षण तातडीने करण्याचे आदेश व्यवस्थापकीय संचालक सिंघल यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक शान्तनू गोयल, नैनाचे मुख्य नियोजनकार रविंद्रकुमार मानकर यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी सिडको भवनात झालेल्या बैठकीत सर्वेक्षणाचा कार्यक्रम संबंधित विभागाला ठरवून देण्यात आला. या सर्वेक्षणात रस्त्याच्या बांधकामांमध्ये किती घरांचे क्षेत्र बाधित होत आहे, नैनाचे भूखंड ज्या जागेवर दिले आहेत त्या प्रत्यक्ष क्षेत्रावर यापूर्वीच काही बांधकामे आहेत का याची माहिती संकलित करण्याचे काम सोपविण्यात आले. या दरम्यान घरांच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यासाठी नवे धोरण सिडको आखण्याचे काम सुरू आहे.

सध्या देवद गावात सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. तसेच नांदगावचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सिडको प्रशासनाने सध्या नगरपरियोजना (टीपीएस) ७ व टीपीएस ११ यामध्ये प्राधान्याने सर्वेक्षण करण्याच्या सूचना व्यवस्थापकीय संचालक सिंघल यांनी दिल्या आहेत.
चौकट

दोन अतिरिक्त उपजिल्हाधिकारी

नैना प्रकल्पाला गती मिळण्यासाठी तसेच सर्वेक्षण व इतर महसूली कामांना वेग येण्यासाठी सिडको मंडळात प्रतिनियुक्तीवर आलेल्या दोन अतिरिक्त उपजिल्हाधिकाऱ्यांना नैना प्रकल्पाची जबाबदारी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक सिंघल सोपविणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नैना प्रकल्प हा खऱ्या अर्थाने येथील शेतक-यांच्या हिताचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांना सोबत घेऊनच सिडको करणार आहे. सर्वेक्षणात नेमकी किती मालमत्ता बाधित होतात याची संख्या समोर येईल. तोपर्यंत याविषय़ीचे धोरण ठरविण्याची कार्यवाही सुरू आहे. नैना प्रकल्पातील पायाभूत सुविधांचे काम सुरू झाल्यावर शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. – विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको