नवी मुंबई : सिडकोच्या घरांच्या किमतीच्या प्रश्नावर व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना तोडगा काढण्याचे आदेश दिले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना दिली. घरे उभारणीसाठी झालेला खर्च आणि विक्री किंमत याचे गणित मांडून यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव मला सादर करण्यास सांगितले आहे. हा प्रस्ताव तयार होताच यासंबंधी बैठक घेऊ, असे मी स्पष्ट शब्दांत सिंघल यांना सांगितल्याचे शिंदे म्हणाले. सरकारला घरांच्या किमतीबाबत तोडगा काढायचा आहे आणि त्यावर काम सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सिडकोने शहरातील काही उपनगरांमध्ये उभारलेल्या घरांच्या किंमती ७० लाखाच्या पुढे असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे. विधिमंडळ अधिवेशनात यासंबंधीचा मुद्दा उपस्थित होताच नगरविकास मंत्री या नात्याने शिंदे यावर बैठक घेऊन तोडगा काढतील असे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले होते. अधिवेशनातच हे सगळे घडल्यामुळे ५७ हजार घरांच्या सोडत प्रक्रिया सध्या थांबली आहे.