Devendra Fadnavis, Navi Mumbai : नवी मुंबई येथे आज, पार पडलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोर सिडको घरांच्या किंमती कमी करा अशी घोषणा करत सिडकोधारकांनी निदर्शने केली. त्यावेळी येत्या १५ दिवसात बैठक घेऊन यावर तोडगा काढला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सिडकोधारकांनी केलेल्या निदर्शनाची व्हिडीओ मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केली आहे.

सिडकोने २६ हजार घरांची काढलेल्या सोडतीमधील घरांच्या किंमती अत्यंत महाग आहेत. या घरांच्या किंमती कमी व्हाव्या असे सिडकोधारकांचे म्हणणे आहे. सिडकोधारकांनी यासंदर्भात अनेक निदर्शने देखील केली. गेल्या काही महिन्यांपासून मनसेने सिडको सोडतधारकांना सोबत घेऊन लढा उभा केला होता. मनसे प्रवक्ते तथा नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील तीन वेळा बैठकीचे आश्वासन देऊन देखील बैठकीला येणे टाळले होते. इतके महिने होऊन सुद्धा राज्य सरकार किंवा सिडको अजून घरांच्या किंमती कमी करत नसल्यामुळे सिडको सोडतधारकांमध्ये नाराजी पसरली आहे.

आज, मराठा क्रांतीसुर्य, माथाडी कामगारांचे दैवत स्व अण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त लिलावगृह कांदा बटाटा मार्केट येथे माथाडी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमात सिडको सोडतधारकांनी हातात पोस्टर्स घेऊन निदर्शने केली. या पोस्टरवर ‘देवाभाऊ आमच्या मागण्या मान्य करा’ ‘सिडको घरांच्या किंमती कमी करा’ असे लिहिले होते. तसेच सिडकोधारकांनी या मागण्यांची जोरदार घोषणाबाजी देखील केली.

यावेळी सर्वांचे लक्ष या सिडकोधारकांकडे वेधले गेले. या सिडकोधारकांना शांत करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून सुरु होता. परंतु, तरी देखील सिडकोधारकांनी घोषणाबाजी कमी केली नाही. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात येत्या पंधरा दिवसात सिडको घरांच्या किंमतीबाबत बैठक घेवून तोडगा काढू असे आश्वासन सिडकोधारकांना दिले.

या निदर्शनाचा व्हिडीओ मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी सिडको घरांच्या किंमती कमी करा … मुख्यमंत्र्यांच्या नवी मुंबई येथील कार्यक्रमात सिडको सोडतधारकांची निदर्शने…येत्या १५ दिवसात बैठक घेवून तोडगा काढू.. मुख्यमंत्र्यांचे आश्वासन असे लिहिले आहे.