उरण : सिडकोने ११ जूनला द्रोणागिरी येथील सेक्टर ६५ मध्ये भूखंडाची सोडत काढली आहे. तेथे कोणत्याही प्रकारच्या पायाभूत सुविधा नसल्याने इरादा पत्र दिले, विकसित भूखंड कधी देणार असा सवाल आता येथील प्रकल्पग्रस्तांकडून केला जात आहे. यापूर्वी सिडकोकडून २००८ साली म्हणजे १६ वर्षांपूर्वी ज्या शेतकऱ्यांना सोडतीमध्ये भूखंड इरादीत केले होते अशा प्रकल्पग्रस्तांना अद्याप भूखंडाचा ताबा मिळालेला नाही. यामुळे द्रोणागिरी सोडतीतील प्रकल्पग्रस्त भूखंड मिळण्याबाबत साशंक आहेत.
सिडकोने प्रकल्पासाठी आपल्या सर्व जमिनी संपादित केल्या आहेत. संपादित जमिनीच्या मोबदल्यासह साडेबारा टक्के विकसित भूखंड देण्याचे मान्य झाले आहे. त्याप्रमाणे काहींना ( ज्या प्रकल्पग्रस्तांनी बिल्डरसोबत व्यवहार केला आहे) देण्यात आले आहेत. परंतु २००८ साली ज्यांना सोडतीमध्ये भूखंड इरादीत झाले होते अशा ५८६ भूखंड धारकांना १६ वर्षांनंतरही सिडकोने पायाभूत सुविधा न केल्यामुळे भूखंडाचा ताबा मिळाला नाही.
हे भूखंड दोन वर्षांपूर्वी सहा महिन्यांत देण्याचे आश्वासन रायगडचे तत्कालीन पालकमंत्री यांनी विधानसभेत दिले होते. त्याची अंमलबजावणी आजतागायत झालेली नाही. त्यातच सिडकोने ११ जून रोजी सेक्टर ६५ मध्ये भूखंडाची सोडत काढली आहे. तेथे कोणत्याही प्रकारच्या पायाभूत सुविधा नाहीत. २००८ साली सोडत काढलेले भूखंड २०२५ मध्ये मिळाले नाहीत तर सेक्टर ६५ मधील कधी मिळणार याबाबत सांशकता आहे.
प्रकल्पग्रस्तांची आज बैठक यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बुधवार २ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७.०० वा. कामगार भवन बोकडवीरा येथे प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी प्रकल्पग्रस्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रामचंद्र म्हात्रे, भूषण पाटील, हेमलता पाटील, भास्कर पाटील व पद्माकर पाटील यांनी केले आहे.