खारघर, पनवेल, कळंबोलीतील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

नवी मुंबई पालिका क्षेत्राप्रमाणेच खारघर, कळंबोली, पनवेल, कामोठे, द्रोणागिरी, उलवा या सिडकोच्या कार्यक्षेत्रातील सिडको निर्मित धोकादायक इमारतींनाही राज्य सरकारने जास्तीत जास्त अडीच आणि कमीत कमी १.८ वाढीव चटई निर्देशांक जाहीर केला आहे. त्यामुळे पनवेल, कळंबोलीत धोकादायक वा मोडकळीस आलेल्या ३० वर्षे जुन्या इमारतींच्या पुनर्बाधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच या निर्णयामुळे या परिसरात येत्या काळात मोठय़ा प्रमाणावर घरे निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या चाळीस वर्षांत सिडकोने नवी मुंबई, पनवेल, उरण या महामुंबई क्षेत्रात एकूण एक लाख २७ हजार घरे बांधलेली आहेत. त्यातील काही गृहप्रकल्पांची दुरवस्था झाली असून या घरांची पुनर्बाधणी करण्यात यावी अशी मागणी सातत्याने केली जात आहे. त्याला प्रतिसाद देत गतवर्षी राज्य सरकारने या घरांना अडीच वाढीव एफएसआय मंजूर केला आहे. या इमारतींच्या पुनर्बाधणीची प्रक्रिया अद्याप परवानग्यांच्या प्रतीक्षेत असतानाच राज्याच्या नगरविकास विभागाने सिडको क्षेत्रातील जुन्या इमारतींनाही वाढीव चटई निर्देशांकाच्या रुपात दिलासा दिला आहे. विकास नियंत्रण नियमावलीतील विनियम ३४ च्या कलम ३७ मध्ये बदल करून काढण्यात आलेल्या अध्यादेशान सिडकोच्या खारघर, कळंबोली, पनवेल, कामोठे, नवीन पनवेल, द्रोणागिरी, उलवा, तळोजा या क्षेत्रासाठी जास्तीत जास्त अडीच व कमीत कमी १.८ वाढीव एफएसआय मंजूर झाला आहे. एक हजार चौरस मीटरपेक्षा जास्त मोठय़ा भूखंडाजवळ वाहतुकीसाठी १५ मीटर रुंदीचा रस्ता असल्यास या भूखंडाला अडीच वाढीव एफएसआय दिला जाणार आहे. नऊ मीटर रुंदीचा रस्ता असल्यास हा एफएसआय कमी होणार असून तो दोनपर्यंत मर्यादित राहणार आहे. त्यानंतरच्या सर्व भूखंडांना १.८ वाढीव एफएसआय दिला जाणार आहे.

सहव्यवस्थापकीय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेली समिती या इमारती धोकादायक अथवा मोडकळीस आलेल्या आहेत की नाही ते ठरवणार आहे. या समितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, कोकण विभागाचे सह संचालक, पालिकेचे शहर अभियंता, सिडकोचे मुख्य अभियंता, नियोजनकार आणि सह व्यवस्थापकीय संचालकांनी नियुक्त केलेले एक या क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्य यांचा समावेश राहणार आहे. सिडकोचे या कार्यक्षेत्राचा काही भाग आता पनवेल पालिकेत समाविष्ट असल्याने शासन निर्णयानंतर त्याचे नियोजन अधिकार पालिकेला प्राप्त होणार आहेत. तोपर्यंत सिडको या पुनर्बाधणीला परवानगी देणारी नियोजन प्राधिकरण संस्था आहे.

फायदा कुणाला?

  • नगरविकास विभागाने जारी केलेल्या या अध्यादेशाचा फायदा दक्षिण नवी मुंबईतील सिडको निर्मित धोकादायक इमारतीत राहणाऱ्या हजारो रहिवाशांना होणार आहे.
  • सिडकोने नवी मुंबईत बांधलेल्या एक लाख २७ हजार घरांपैकी जवळजवळ ३० हजारे घरे या दक्षिण नवी मुंबईत आहेत. त्यातील ११ हजार घरे ही कळंबोली पनवेल भागात आहेत.
  • कळंबोली, पनवेल, नवीन पनवेल या भागातील काही सिडको निर्मित घरांची अवस्था जीर्ण झाली आहे. तेथील रहिवाशांची पुनर्बाधणीची गेली अनेक वर्षे मागणी होती.
  • खारघर, कामोठे, द्रोणागिरी, उलवा या भागातील घरे तुलनेने नवीन असून ती धोकादायक वा मोडकळीस आलेल्या घरांच्या व्याख्येत बसणारी नाहीत. त्यामुळे वाढीव एफएसआयद्वारे पुनर्बाधणी होणारे क्षेत्र कळंबोली व पनवेलमध्ये असेल.
  • पुनर्बाधणीचे नियम व अटी पूर्ण केल्यानंतर इमारतींच्या नव्याने विकासासाठी बांधकाम व्यावसायिक पुढे सरसावण्याची शक्यता आहे.