नवी मुंबई : पनवेलसह नवी मुंबई आणि नैना शहराचा सर्वांगीण विकास लक्षात घेता, सिडको महामंडळाने २०५४ पर्यंतचा सर्वसमावेशक आणि पर्यावरणदृष्ट्या शाश्वत असा परिवहन आराखडा (सीएमपी) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. वेगाने वाढणारी शहरीकरणाची गती, वाढती लोकसंख्या आणि पर्यावरणीय आव्हानांचा सामना करत, या आराखड्यात सार्वजनिक आणि खासगी वाहतूक तसेच पादचारी, सायकलस्वार यांसारख्या पर्यायांचे एकत्रीकरण साधले जाणार असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.

विविध पायाभूत सुविधांनी नवी मुंबईतील ठाणे-बेलापूर मार्ग, पाम बीच मार्ग, अटल सेतू, रेल्वे मार्ग, मेट्रो सेवा व बस सेवा यामुळे प्रादेशिक दळणवळण एकमेकांना जोडले जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो मार्ग क्र. ८, पनवेल-कर्जत रेल्वे व इतर योजनांमुळे भविष्यात वाहतुकीवर अधिक ताण येणार असल्याने दीर्घकालीन नियोजन आवश्यक ठरत असल्याने सिडकोने यामध्ये पुढाकार घेतला आहे.

सीएमपीमुळे नवी मुंबई आणि नैना क्षेत्रातील दळणवळण, वाहतूक व्यवस्थापन, रस्ता सुरक्षा, वाहतूक अभियंत्रिकी, तसेच उत्पन्नासाठी केंद्रीय मदतीचा मार्ग मोकळा होणार असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. दीर्घकालीन दृष्टीकोनातून हा आराखडा भविष्यातील दळणवळणाच्या गरजांना उत्तरे देणारा ठरेल.

शेतकऱ्यांचा विरोध कायम

सिडको मंडळाने नैना प्रकल्पातील पायाभूत सुविधांसाठी सुमारे ८ हजार कोटी रुपयांची कामे हाती घेतली असून, त्यासाठी ठेकेदारांची निवड झाली आहे. मात्र, प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेले नाही. शेतकऱ्यांना ६० – ४० या पुनर्विकास सूत्राबाबत अजूनही तीव्र नाराजी असून, ४० टक्के विकसित भूखंडासोबत पायाभूत सुविधांसाठी जी जमीन बाधित होते, त्याबदल्यात विमानतळ बाधित शेतकऱ्यांप्रमाणे नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी वाढली आहे. मात्र, या मागणीवर राज्य सरकारकडून अद्याप कोणताही स्पष्ट निर्णय झालेला नाही. त्यामुळे नैना प्रकल्पास जोरदार विरोध सुरूच आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, कॉर्पोरेट पार्क, एरोसिटी, एज्युसिटी, लॉजिस्टिक पार्क, मेडीसिटी या प्रकल्पांसह निवासी व औद्योगिक वाढ, या घटकांमुळे नवी मुंबईतील वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई क्षेत्राकरिता सिडको व अन्य प्राधिकरणांना वैविध्यपूर्ण, सर्वसमावेशक आणि भविष्यसिद्ध परिवहन प्रणाली विकसित करण्याकरिता सीएमपी मार्गदर्शक ठरणार आहे.विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको