नवी मुंबई : सिडकोने नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. १ (बेलापूर ते पेणधर) साठी रविवार व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी मेट्रो सेवा दर १५ मिनिटांनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित वेळापत्रक ११ मे म्हणजे रविवारपासून लागू होणार आहेत.

सिडकोने मेट्रो गाड्यांच्या नियमित देखभालीच्या दृष्टीने तसेच प्रवासी वाढण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. नवीन वेळापत्रकानुसार, रविवारी व सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये बेलापूर आणि पेणधर मेट्रो स्थानकांवरून पहिली मेट्रो सकाळी ६ वाजता धावेल. बेलापूरहून शेवटची मेट्रो रात्री १० वाजता व पेणधरहून रात्री पावणेदहा वाजता सुटणार आहे. या दिवशी मेट्रो दर १५ मिनिटांच्या अंतराने उपलब्ध राहणार आहे. रविवार व सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त अन्य सर्व दिवशी मेट्रो सेवा पूर्वीच्या वेळापत्रकानुसारच सुरू राहतील असे सिडकोने स्पष्ट केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१७ कोटींचे उत्पन्न

नवी मुंबई मेट्रो सेवा सुरू होऊन १७ महिने पूर्ण झाले. आतापर्यंत ७० लाखांहून अधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. तिकीट विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी रुपयांचे उत्पन्न जमा झाले आहे. याशिवाय, नुकतीच नवी मुंबई मेट्रोची गती चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असून लवकरच या मार्गावरील प्रवास आणखी जलद व कार्यक्षम होणार असल्याचे सिडकोने सांगितले.