नवी मुंबई : नवी मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांलगत २५ हजार घरांच्या महागृहनिर्माणाची सोडत २ ऑक्टोबरला सिडको महामंडळ काढणार आहे. यावेळी आठ किंवा दहाव्या मजल्यावरील घर घेणाऱ्यांना अधिकचा प्रीमियम द्यावा लागणार आहे. त्यामुळे सिडकोची आठव्या मजल्यांवरील घरे महाग होणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत सिडकोने अद्याप अंतिम निर्णय घेतला नसला तरी सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर अंतिम धोरण ठरणार आहे.

महागृहनिर्माणाच्या सोडतीत भाग घेणाऱ्यांसाठी पहिल्यांदा सिडको नवा प्रयोग करत आहे. यामध्ये इच्छुकांना इमारत, मजला आणि सदनिका निवडण्याचा अधिकार सिडको देत आहे. तसेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर ही सोडत प्रक्रिया राबवून एका सदनिकेसाठी अनेक अर्ज आले तरच त्या सदनिकेसाठी सोडत केली जाईल, अशी माहिती बुधवारी सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिली.

हे ही वाचा…नवी मुंबई :माथाडी मंडळातील बनावट संघटनांच्या गुंडगिरीला चाप लावा,माथाडी संघटनेचे नरेंद्र पाटील यांचा गृहमंत्र्यांना घरचा आहेर

सिडको ६७ हजार घरे बांधत असून यापैकी सुमारे २५ हजार घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे अशांचा समावेश यावेळी सोडतीमध्ये केला जाणार आहे. तसेच २ ऑक्टोबरला घरे विक्त्रस्ीसाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यासाठी सिडको मंडळाने हालचाली सुरू केल्या आहेत. घरे विक्रीसाठी सिडको पहिल्यांदाच विशेष प्रयोग राबवत आहे. या प्रयोगाच्या विक्री तत्त्वानुसार सात मजल्यापर्यंत इच्छुक नागरिक त्यांच्या घराची पसंती करून अर्ज नोंदणी करू शकतील. मात्र त्याहून वरील म्हणजे ८ किंवा १० व्या मजल्यावरील घरांसाठी इच्छुक नागरिकांना अधिकचे प्रीमियम भरावे लागणार असल्याची माहिती सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिली. याबाबतचा सिडको मंडळाच्या संचालक मंडळाने अद्याप अंतिम निर्णय घेतला नसला तरी सिडकोच्या मार्केटिंग विभागाने प्रस्ताव सिडकोच्या उच्चपदस्थांसमोर मांडला आहे. इमारतीच्या सातव्या मजल्यापर्यंत अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी सिडकोने यावेळी बाजारमूल्यापेक्षा १० टक्के घरांच्या किमती कमी करण्याचे धोरण आखले आहे. बांधकाम खर्चाचा तोटा होऊ नये म्हणून सिडकोने महागृहनिर्माणात केलेला खर्च वसूल करण्यासाठी ८ किंवा १० मजल्यावरील सदनिकाधारकांकडून अधिकचा प्रीमियम आकारून त्यामधून तोटा भरून निघेल, असे धोरण आखले आहे.

हे ही वाचा…नवी मुंबई : माथाडी राजकारणाला शिंदे गटाची बगल? मराठाबहुल मेळाव्यावर भाजपचा प्रभाव

अपसेट दर म्हणजे काय?

ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या सोडत प्रक्रियेमधील घरांच्या किमती अपसेट दरापेक्षा १० टक्क्यांपेक्षा कमी असणार असे सिडकोचे अध्यक्ष शिरसाट यांनी जाहीर केले. अपसेट दर म्हणजे, एखादी गृहनिर्माण योजना तयार करताना सिडको किंवा म्हाडासारखे महामंडळ त्यावेळच्या बाजारात खासगी विकासक आणि दुय्यम निबंधक कार्यालयात सदनिकांच्या होत असलेल्या विक्री दराचा आढावा घेते. या दराच्या आसपास सिडकोचे घर विक्रीवेळी दर असावेत यालाच अपसेट किंमत म्हटले जाते. याच अपसेट किमतीपेक्षा १० टक्के कमी किंमत अत्यल्प व अल्प उत्पन्न गटाकडून आकारली जाणार आहे.

किमती किती असतील याकडे सगळ्यांचे लक्ष

यापूर्वी बामणडोंगरीच्या घरांच्या किमती सुरुवातीला ३५ लाख रुपये इतक्या होत्या. त्यानंतर राजकीय शक्तींच्या मदतीने किंमत कमी करण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर ही किंमत २९ लाख रुपये प्रति सदनिका करण्यात आली. सिडको अध्यक्षांनी नवीन घरांच्या किमती १० टक्के अपसेट किमतीपेक्षा कमी असल्याची घोषणा केल्यानेे या किमती किती कमी असतील याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा…नवी मुंबई :वेश्या व्यवसायातील दलालावर कारवाई चार महिलांची सुटका, एका अल्पवयीन मुलीचा समावेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाजारातील अपसेट दराच्या १० टक्के कमी दराने अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना घरे मिळावी असेच सिडकोचे धोरण आहे. प्रीमियम घेऊन आठव्या व १०व्या मजल्यांवरील घरे देण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. त्याविषयी अंतिम निर्णय लवकरच घेऊ.- संजय शिरसाट, अध्यक्ष, सिडको महामंडळ