नवी मुंबई – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन बुधवारी (आज) दुपारी तीन वाजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मात्र उद्घाटनाच्या काही तास आधीच विमानतळ परिसरात उत्सुक नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दोन विमानं विमानतळावर उभी असल्याचे दृश्य महामार्गावरून स्पष्ट दिसताच नागरिकांनी थांबून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनण्याचा प्रयत्न केला. जेएनपीए बंदराकडून कळंबोली सर्कलकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ या सर्वात लहान महामार्गावरील पनवेल येथील उड्डाणपुलाजवळ ही अनपेक्षित गर्दी झाली होती.
अनेकांनी आपली वाहने थांबवून मोबाईल कॅमेऱ्यातून विमानांचे फोटो आणि व्हिडिओ टिपले.पनवेल आणि आसपासच्या भागातील नागरिक अनेक वर्षांपासून या विमानतळाच्या प्रत्यक्ष कार्यान्वयनाची प्रतीक्षा करत होते. त्यांच्या प्रतीक्षेचा शेवट अखेर जवळ आला आहे. उरण जेएनपीए कडून कळंबोली सर्कलकडे येणाऱ्या महामार्गावरून विमानतळाचे दर्शन होत असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, एक धावपट्टी आणि एक टर्मिनल इमारत वापरासाठी सज्ज आहे. या टप्प्यात ४८ विमानं एकावेळी उभी राहू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.यातील तीन स्टँड ‘कोड एफ’ प्रकारच्या मोठ्या विमानांसाठी राखीव आहेत.
ज्यामध्ये एअरबस ए-३८० या विमानांचा समावेश होतो. तर उर्वरित स्टँड इतर विमानांसाठी वापरले जातील. पुढील काही वर्षांत हा विमानतळ चार टर्मिनल्स आणि दोन समांतर धावपट्ट्यांसह विस्तारला जाणार आहे. त्यानंतर ३०० विमानं एकावेळी उभी राहू शकतील एवढी या विमानतळाची क्षमता असेल.हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबई विमानतळ मुंबईतील वाहतूक भार कमी करण्यास मोठी मदत करेल. तसेच पुणे, रायगड, ठाणे जिल्हा आणि संपूर्ण कोकण भागासाठी नव्या आर्थिक संधींचे दार उघडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या उत्साहामुळे या प्रकल्पाविषयीचा अभिमान आणि भावनिक जिव्हाळा स्पष्टपणे पनवेलमध्ये जाणवत आहे.