नवी मुंबईकरांना प्राधान्य देण्यासाठी महापालिका प्रशासन शासनाकडे तक्रार करणार
नवी मुंबई : केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी १ मे पासून ऑनलाइन नोंदणीनंतर लसीकरण सुरू केले असून यामुळे नवी मुंबईत लस घेणाऱ्या शहराबाहेरील नागरिकांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना प्रथम प्राधान्य मिळावे यासाठी पालिका शासनाकडे दाद मागणार आहे.
मात्र ऑनलाइन नोंदणीमध्ये अशा प्रकारचा भेदभाव करता येत नसल्याचे समजते. नवी मुंबईत आतापर्यंत सव्वातीन लाख नागरिकांचे लसीकरण झाले असून यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची संख्या नऊ हजार आहे. या नऊ हजारामध्ये शहरातील आणि शहराबाहेरील असे वर्गीकरण केले गेले नसले तरी शहराबाहेरील नागरिकांची संख्या दोन हजारापर्यंत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जानेवारीपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी देशात टप्प्याटप्प्याने लसीकरण सुरू झाले आहे. १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू झाले असून त्याची ऑनलाइन नोंदणी होत आहे. संध्याकाळी पाच वाजता प्रत्येक शहरांचा कोटा जाहीर केला जात असून ऑनलाइन नोंदणीद्वारे तो नागरिकांना मिळत आहे. त्यासाठी दररोज संध्याकाळी पाच वाजता ऑनलाइन नोंदणीसाठी आरोग्य सेतु किंवा उमंग या संकेतस्थळावर नोंदणी करण्यासाठी झुंबड उडत असून काही मिनिटात ही नोंदणी समाप्त होत आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रयत्न करणाऱ्या नागरिकांना काही दिवसांच्या प्रयत्नांनंतर क्रमांक लागत आहे. यात तरुणाई आघाडीवर असल्याने त्यांची नोंदणी होत असून मर्यादित कोटा असल्याने काही नागरिकांना ही लस मिळत आहे. त्यासाठी अनेक दिवस प्रयत्न करावे लागत असल्याचे नागरिक सांगत आहेत.
नवी मुंबईत तीन मोठी रुग्णालये असून २८ लसीकरण केंद्रे आहेत. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मर्यादित लसीकरण होत असल्याने ते या तीन मोठय़ा रुग्णालयात अतिशय योग्य पद्धतीने टोकन देऊन केले जात आहे. त्यासाठी या नागरिकांना वेळेची मर्यादा देखील घालून देण्यात आली आहे. आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील ९ हजार ७४३ नागरिकांचे लसीकरण झाले असून पालिका रुग्णालयातील यातील संख्या ही ५८९३ आहे तर खासगी रुग्णालयात ३८५० नागरिकांनी लस टोचून घेतलेली आहे. यात शहराबाहेरील नागरिकांची संख्या ६० टक्के असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी पालिका आयुक्त अभिजीत बांगर शासनाकडे करणार आहेत, मात्र अशा प्रकारे ऑनलाइन लसीकरणात शहराचे प्राधान्य ठरवता येणार नसल्याचे समजते.
लसीकरण
* एकूण लसीकरण : ३२३९३५
* पहिला डोस : २४४७५१
* दुसरा डोस : ७९१८४
* १८ ते ४४ वयोगट : ९७४३
१५ हजारात मात्रा
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करताना काळाबाजार होत असल्याची चर्चा आहे. ऑनलाइन नोंदणी असल्याशिवाय हे लसीकरण होत नाही. त्यासाठी अनेक नागरिक तरुण हे संध्याकाळी पाच वाजता ऑनलाइन नोंदणीसाठी संगणकासमोर ठाण मांडून बसत आहेत मात्र अनेक प्रयत्नांनंतर हा क्रमांक लागत आहे.
याचवेळी काही तरुण लवकर लस मिळावी यासाठी १५ हजारात एक डोस घेण्याची तयारी देखील दर्शवीत आहेत. काही खासगी रुग्णालये ही सुविधा देत असल्याचे वाशी येथील एका तरुणाने सांगितले.
नवी मुंबई पालिकेने लसीकरणाची योग्य ती व्यवस्था केलेली आहे. शहरात तीन अद्ययावत अशी मोठी रुग्णालये असून या ठिकाणी १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. इतर लसीकरणासाठी २८ लसीकरण केंद्रे कार्यरत आहेत. ऑनलाइन लसीकरणासाठी प्रतीक्षा कक्ष उभारण्यात आले असून नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी सर्व केंद्रात घेतली जात आहे. ऑनलाइन नोंदणी असल्याने शहराबाहेरील नागरिकही याचा फायदा घेत आहेत.
डॉ. रत्नप्रभा चव्हाण, वैद्यकीय अधिकारी (लसीकरण) नवी मुंबई पालिका
