उरण : मत्स्य व मत्स्यबीज व्यवसायाशी संबंधित श्रमिक मच्छिमारांच्या अनेक समस्या असून देशातील अनेक किनारपट्टीवरील मच्छिमार संघटीत आहेत. त्याचप्रमाणे रायगड व कोकण किनाऱ्यावरील मच्छिमारांनी आपल्या हक्कासाठी संघटीत व्हावे असे आवाहन मंगळवारी जेएनपीटी कामगार वसाहतीच्या बहुद्देशी सभागृहात आयोजित मच्छिमार मेळाव्यात सीआयटीयुच्या अखिल भारतीय अध्यक्ष कॉ. के हेमलता यांनी केले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन्स(सीआयटीयु)च्या नेतृत्वातील कोकण किनारा मच्छिमार संघटनेची स्थापना करण्यात आली.

कोकणच्या समुद्र किनाऱ्यावर यांत्रिक व पारंपरिक आशा दोन्ही पद्धतीने मासेमारी केली जाते. तसेच याच किनारपट्टीवरील शेतकरी हा खोल समुद्रात जीव धोक्यात घालून मासेमारी करीत आहे. या श्रमिक व कष्टकरी मच्छिमारांच्या अनेक समस्या आहेत. आशा अनेक वर्षे आपल्या हक्कापासून वंचीत मच्छिमारांच्या समस्या देश पातळीवर असलेल्या सीआयटीयुच्या मच्छिमार संघटनेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी सिटूच्या झेंड्याखाली मच्छिमारांना संघटीत करण्यात येत आहे. नवनविन होणाऱ्या कायदयामूळे मच्छीमार बांधवांच्या मूलभूत हक्क व अधिकारावर गदा येत आहे. त्यामुळे नैसर्गिक संकटाबरोबरच प्रशासकीय संकटालाही या मच्छीमार बांधवाना सामोरे जावे लागत आहे. शासनाच्या बदलत्या धोरणामुळे मच्छिमारांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोकण किनारा मच्छिमार संघटना स्थापन करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>पनवेल: सर्वात तरुण महापालिकेचा माझी वसुंधरा अभियानात राज्यात तिसरा क्रमांक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मेळाव्याला सिटुचे महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी एम. एच.शेख, जेएनपीटीचे माजी विश्वस्त कॉ. भूषण पाटील, फॉरवर्ड सिमेन्स यूनियनचे अध्यक्ष मनोज जाधव, रायगड जिल्हाध्यक्ष मधूसूदन म्हात्रे,या मेळाव्याचे प्रमुख संघटक व सिटूचे नेते कॉ. संदीप पाटील,के.आर. रघु, यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्यासाठी सुरेश कोळी, मारुती पाटील,दिलीप पाटील काशिनाथ पाटील यांनी मेहनत घेतली. मेळाव्यासाठी रायगड जिल्ह्यातील शेकडो मच्छिमार महिला व पुरुष उपस्थित होते.