नवी मुंबई : नवी मुंबईत महाराष्ट्र राज्य वगळता विविध राज्यांची भवने दिमाखात उभी आहेत. जवळजवळ १५ वर्षांपासून कागदावरच सीमित राहिलेला महाराष्ट्र भवनचा प्रकल्प अखेर मार्गी लागणार असून येत्या शुक्रवारी वाशी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भवनाचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी लोकसत्ताला दिली.

मागील अनेक वर्षांपासून शहरात राज्यातील नागरिकांसाठी नवी मुंबईत हक्काचे एक ठिकाण असावे असा प्रयत्न विविध पातळीवर झाला. आ. मंदा म्हात्रे यांच्यासह विविध घटकांनी व पक्षांनी यासाठी पाठपुरावा केला असून सिडकोने या प्रकल्पाच्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली. वाशी सेक्टर ३० ए येथील सुमारे आठ हजार चौरस मीटर भूखंडावरील प्रस्तावित महाराष्ट्र भवनच्या उभारणीसाठी १२१ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : आवक वाढूनही दर्जा खालावल्याने भाज्या महाग

सिडकोने विविध राज्यांच्या भवनांसाठी वाशी परिसरात भूखंड दिले आहेत. विशेष म्हणजे त्यावर विविध राज्यांच्या वास्तू उभारल्या आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्र भवनसुद्धा उभारले जावे, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार सिडकोने वाशी रेल्वे स्थानकाजवळ सुमारे दोन एकरचा भूखंड महाराष्ट्र भवनसाठी आरक्षित ठेवला होता. अनेक वर्षांपासून तो पडूनच असल्याने आ. मंदा म्हात्रे यांनी पाठपुरावा सुरू केला. विवध राजकीय पक्षांनी येथे आंदोलने केली होती. आता अत्याधुनिक सुविधांनी युक्त भवन पुढील काही वर्षांत बांधून पूर्ण होईल, असा विश्वास सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>> सिडको हस्तांतरण शुल्क रद्द करण्याच्या निर्णयाकडे नवी मुंबईकरांचे लक्ष

११ ऑक्टोबरला मुख्यमंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत या वास्तूचा भूमिपूजनाचा सोहळा होणार असून महाराष्ट्र भवन हे तमाम महाराष्ट्रीय नागरिकांसाठी ‘ड्रीम प्रोजेक्ट’ ठरेल. सिडकोच्या गोल्फकोर्स तसेच नवी मुंबई विमानतळावरील सुखोई विमानाची चाचणीही होणार आहे. – संजय शिरसाट, अध्यक्ष, सिडको

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र भवन साकारले जाणार असून त्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला होता. सर्वांनाच अभिमान वाटावा असावा अशी देखणी वास्तू निर्माण होणार आहे याचा अत्यानंद आहे. – मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर