आतापर्यंत शहरात सव्वा आठ लाख जणांच्या चाचण्या

नवी मुंबई : नवी मुंबईतील करोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत  असून नवी मुंबईत प्रत्येक दिवशी करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढवली असून दिवसाला प्रतिजन व आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या ९ हजाराच्या पुढे गेली आहे. तर पालिकेने जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्या करण्याकडे लक्ष केंद्रित केले असून आतापर्यंत जवळजवळ ८ लाख २५ हजार नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर दुसरीकडे शहरात प्रतिजन व आरटीपीसीआर चाचण्यांच्या किटचा तुटवडा नसून पालिकेकडे या किटचा पुरवठा सुरळीत होत असल्याची माहिती शहरातील करोना चाचण्यांचे प्रमुख डॉ.अजय गडदे यांनी दिली आहे.

करोना रुग्णांची संख्या कमी झाली तेव्हा शहरात सरासरी दिवसाला १ हजार चाचण्या त्यानंतर एप्रिलच्या सुरुवातीला दिवसाला ५ हजार, तर आता दिवसाला ९ हजाराच्या पुढे चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे शहरातील करोना चाचणी केलेल्यांची संख्या ८ लाख २५ हजारावर जाऊन पोहचली असून पालिका क्षेत्रात जास्तीत जास्त चाचण्या करण्याकडे पालिकेने लक्ष दिले असून लवकर निदान व लवकर उपचार याप्रकारे मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे मागील काही दिवसात पालिकेच्या प्रत्येक करोना चाचणी केंद्रावर चाचणी करण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  केंद्राने व राज्याचे मुख्यमंत्री यांनीही करोना चाचण्या वाढवण्याचे निर्देश सर्वत्र दिले आहेत. तर दुसरीकडे नवी मुंबईत लोकसंख्येच्या मानाने करोना चाचण्यांचा दर हा मोठा असून अधिक चाचण्या करण्यासाठी पालिका सातत्याने पाठपुरावा करत आहे.  शहरातील करोना चाचण्यांच्या संख्येत वाढ झाली असून दहा लाख लोकसंख्येमागे सध्या १३९८ चाचण्या करण्यात येत आहेत.

शहरात सरासरी दिवसाला ९ हजारपेक्षा अधिक चाचण्या केल्या जात असून नवी मुंबईचा प्रति दशलक्ष चाचणी दर महाराष्ट्रात चांगला आहे. शहरात ४० केंद्रावर चाचण्या करण्यात येत असून कृषी उत्पन्न बाजार समिती येथे  जास्तीत जास्त चाचण्या करण्याकडे पालिकेचे लक्ष्य आहे.   –अभिजीत बांगर, आयुक्त, पालिका