नवी मुंबईत आज लसीकरण ठप्प

नवी मुंबई : लसीकरणात नवी मुंबई ठाणे जिल्ह्यात आघाडीवर आहे, मात्र लस तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेत वारंवार व्यत्यय येत आहे. बुधवारी ४९ लसीकरण केंद्रांपैकी १३ केंद्रांवर लसीकरण झाले मात्र सायंकाळपर्यंत लस पुरवठा न झाल्याने गुरुवारी लसीकरण ठप्प होणार आहे. पालिकेच्या तीन रुग्णालयांत लसीकरण सुरू राहणार आहे.

येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी, सध्या सुरू असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचा गोंधळच निस्तरता नको झाला आहे. लशींच्या मर्यादित साठ्यामुळे करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सातत्याने व्यत्यय येत आहे.

शहरात आतापर्यंत सुमारे २ लाख २५ हजार जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई महापालिकाही लसीकरणात अग्रेसर आहे. शहरात एकूण ४९ केंद्रांवर लसीकरण केले जात असून दिवसाला १० हजार लसीकरण करण्याचे पालिकेने लक्ष ठेवले आहे. मात्र लस पुरवठा होत नसल्याने लसीकरणात खंड पडत आहे. लशींअभावी केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत.

बुधवारी लस तुटवडा असल्याने ठरावीक केंद्रांवरच लसीकरण झाले. मागणीनुसार लसच प्राप्त होत नसल्याने सर्वत्रच तुटवडा जाणवत आहे. बुधवारी १३ केंद्रांवर लसीकरण झाले. मात्र सायंकाळपर्यंत लस उपलब्ध झाली नाही. त्यामुळे गुरुवारी लसीकरण ठप्प होणार आहे.  ४९ केंद्रांपैकी फक्त महापालिकेची नेरुळ, वाशी, ऐरोली येथील ३ रुग्णालयांमध्येच लसीकरण करण्यात येणार आहे.

लसीकरण मोहीम अत्यंत व्यवस्थित सुरू आहे. शासनाकडून मागणीनुसार  लस प्राप्त होत नाही. त्यामुळे लसीकरण खंडित होत आहे. ज्याप्रमाणे लस पुरवठा होत आहे त्याप्रमाणे शहरात लसीकरण करण्यात येत असल्याचे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

५० टक्क्यांहून अधिक केंद्रे बंद

ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर तसेच

ठाणे ग्रामीण भागांत शासकीय आणि खासगी असे एकूण २३२ लसीकरण केंद्रे आहेत. दररोज प्रत्येक केंद्रावर १०० नागरिकांचे लसीकरण करण्याचे शासनाचे लक्ष्य आहे. त्यानुसार, लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र लशींचा पुरेसा साठा मिळत नसल्यामुळे दिवसाआड यापैकी ५० टक्क्यांहून अधिक केंद्रे बंद ठेवण्याची वेळ येते, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

लशीचा साठा नियमित आणि पुरेसा प्रमाणात उपलब्ध होताना अडचणी येत असल्यामुळे काही केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत ही वस्तुस्थिती आहे. मात्र उपलब्ध साठ्यात अधिकाधिक जणांचे लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. ग्रामीण भागांतही लसीकरण मोहिमेविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली जात आहे. १८ वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेचे लवकरच नियोजन केले जाईल. – डॉ. गौरी राठोड, उपसंचालक, आरोग्य विभाग, ठाणे जिल्हा