करोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट
नवी मुंबई</strong> : दिवाळीनंतर करोना रुग्णांत वाढ झाल्याने ३५२ दिवसांवर गेलेला रुग्णदुपटीचा कालावधी कमी होत २६५ दिवसांवर आला होता. आता गेल्या काही दिवसांपासून बाधितांची संख्या पुन्हा कमी झाल्याने हा कालावधी आता ४५४ दिवस म्हणजे एक वर्ष तीन महिन्यांपर्यंत गेला आहे.
नवी मुंबईतील करोना संसर्गाची परिस्थिती आटोक्यात येत असली तरी नागरिकांनी काळजी घेत सुरक्षित अंतराचा नियम व मुखपट्टीचा वापर करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
दिवाळीपूर्वी शहरात करोना रुग्णदुपटीचा कालावधी हा ११ नोव्हेंबर रोजी ३५२ दिवसावर गेला होता. त्यानंतर नागरिकांनी बेफिकिरी करीत दिवाळीच्या खरेदीसाठी मोठया संख्येने घराबाहेर पडले. यावेळी नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली. दिवाळीपूर्वी शंभरच्या खाली आलेली करोनाबाधितांची संख्या परत दोनशेच्या घरात पोहचली. भाऊबीजेच्या दिवशी शहरात ६१ नवे करोनाबाधित आढळले होते. ही या काळातील सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली होती. मात्र त्यानंतर रुग्णसंख्या दुपटीने वाढत गेली होती. त्यामुळे ३५२ दिवसांवर गेलेला रुग्णदुपटीचा कालावधी कमी होत २६५ दिवसांवर आला होता. आता पुन्हा करोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या महिनाभरात सोमवारी नवी मुंबईत ६२ तर मंगळवारी ५२ करोनाबाधित आढळले आहेत. बाधितांची संख्या कमी होत असल्याने आता रुग्णदुपट्टीचा कालावधीतही वाढ होत तो ४५४ दिवसांवर म्हणजे एक वर्षे तीन महिन्यांपर्यंत गेला आहे.
मे महिन्यात सहा दिवसांवर
मार्च महिन्यात शहरात करोनाचा संसर्ग सुरू झाला. मे महिन्यात करोनारुग्ण दुपटीचा कालावधी हा ११ दिवसांवरून ६ दिवसांवर खाली आला होता.
मंगळवारी ५२ नवे बाधित
नवी मुंबईत मंगळवारी ६२ नवे करोनाबाधित आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३५ जण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे शहरातील करोनाबाधितांची संख्या ४९,७६७ इतकी झाली असून मृतांचा आकडा १०१९ इतका झाला आहे. शहरात एकूण ४५,७०५ जण करोनामुक्त झाले आहेत.
रुग्णदुपटीचा कालावधी
* १५ ऑगस्ट : ४५ दिवस
* १५ सप्टेंबर : ६७ दिवस
* १५ ऑक्टोंबर : १११ दिवस
* १५ नोव्हेंबर : ३५२ दिवस
* १५ डिसेंबर : ४५४ दिवस
( १ वर्ष ८९ दिवसांवर)
शहरातील करोनाचे नवे रुग्ण कमी होत आहेत. त्यामुळे रुग्णदुपटीचा कालावधी हा एक वर्षांपेक्षा अधिक झाला आहे. करोनाचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांच्या सहकार्याने शहरात करोनावर मात करता येणार आहे.
– संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त