नवी मुंबई : दिवाळीपूर्वी कमी झालेली करोनाबाधितांची संख्या दिवाळीनंतर वाढत आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांतही वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत दीड हजार उपचाराधीन रुग्ण असून यात सर्वाधिक ३८२ रुग्ण हे बेलापूर विभागात तर त्यानंतर नेरुळ विभागात २८९ रुग्ण आहेत. शहरात सर्वात कमी म्हणजे २३ रुग्ण हे दिघा परिसरात आहेत.
नवी मुंबई शहरात करोनाबाधितांची संख्या ४८ हजार पार झाली असून आतापर्यंत ९८२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवाळीपूर्वी शहरातील करोनास्थिती नियंत्रणात येत होती. दिवसाला बाधितांची संख्या ही शंभरच्या खाली आली होती. मात्र दिवाळीनंतर यात वाढ होत आता बाधितांची दरदिवसाची संख्या ही दोनशेच्या घरात आहे. उपचाराधीन रुग्णांतही वाढ होत आहे.
२४ जूनपर्यंत उपचाराधीन रुग्ण २ हजारांच्या वर गेले होते. त्यानंतर यात वाढ होत ही संख्या ३५०० पर्यंत पोहचली होती. दिवाळीपूर्वी ती कमी होत १ हजारापर्यंत खाली आली होती. आता यात वाढ झाली असून ती १६५२ पर्यंत गेली आहे.
सोमवारी ७४ नवे करोनाबाधित
नवी मुंबई : दिवाळीनंतर सातत्याने करोनाबाधित वाढत असून सोमवारी ७४ नवे करोनाबाधित आढळले आहेत. शहरात एकू ण ४८ हजार २५१ करोनाबाधित झाले आहेत. सोमवारी दोन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ही ९८४ इतकी झाली आहे. ११९ जण करोनामुक्त झाले असून १६०५ करोना रुग्ण उपचाराधीन आहेत.
आज विशेष बैठक
दिवाळीनंतर करोनाबाधितांत वाढ होत असली तरी अजूनही ती मर्यादित आहे. दिवाळीनंतर १५ दिवस होऊन गेले आहेत. पुढील १५ दिवस महत्त्वाचे आहेत. याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक घेण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.