गेल्या वर्षीपेक्षा ४० टक्यांनी सायबर फसवणूकीचे प्रमाण कमी संतोष सावंत, शेखर हंप्रस, लोकसत्ता पनवेल – नवी मुंबई परिसरात दिवसात एक तरी सायबर फसवणूकीची घटना घडत आहे. सायबरच्या माध्यमातून शेअर मार्केट ट्रेडींगमध्ये जास्तीचा नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने सर्वाधिक गुंतवणूकदारांची लूट होत आहे. विशेष म्हणजे फसगत होणा-यांमध्ये सर्वाधिक प्रमाणे उच्चशिक्षित तरूणांचे आणि सेवानिवृत्त जेष्ठ नागरिकांचे असल्याचे समोर येत आहे. यंदाच्या वर्षी १० महिन्याच्या मध्यांतरापर्यंत २६७ गुन्ह्यांमध्ये ९१ कोटी ६७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे.

मात्र गेल्या दोन वर्षात सायबर चोरी थांबविण्यासाठी पोलीस आयुक्तांनी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे यंदाच्या वर्षी फसवणूकीची संख्या ४० टक्यांनी घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मंगळवारी पुन्हा अशाच प्रकरणाच्या फसवणूकीची घटना सायबर पोलीस ठाण्यात दाखल झाली. खारघर येथील सेक्टर २० मधील ग्रीन हेरीटेज या इमारतीमध्ये राहणारा ४० वर्षीय तरूणाने सायबर पोलीसांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर या एका महिन्यात या तरूणाची १ कोटी ७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. एका संकेतस्थळावरून या तरूणाला संपर्क साधण्यात आला. शेअर मार्केटमधून अधिक नफा मिळवून देतो असे आमिष दाखवून या तरूणाची वैयक्तिक माहिती मिळविण्यासाठी अॅप डाऊनलोड करण्याचे सांगून त्याच्या मोबाईलवर लिंक पाठवण्यात आली.

 त्यानंतर विविध बॅंक खात्यांमध्ये त्याला गुंतवणुकीची रक्कम जमा करण्यासाठी सांगण्यात आले.  गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर महिन्याच्या मध्यांतरापर्यंत २६७ विविध गुन्हे सायबर फसवणूकीचे दाखल झाले. यामध्ये ९० कोटी रुपयांचे नूकसान झाले. गेल्या वर्षी ४३६ गुन्ह्यांमध्ये सूमारे ४४० कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाली होती. सध्या समाजमाध्यमांवर शेअर बाजारातून अनेक पटींचा नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने फसव्या जाहिराती आणि आमिष देणाऱ्या मेसेज, मोबाईल कॉलच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक केली जात आहे.

विशेष म्हणजे या फसवणूकीत उच्चशिक्षित आणि सेवानिवृत्त जेष्ठ नागरिक बळी पडत आहेत. दोन वर्षांपूर्वी पोलीस आयुक्त पदाचा पदभार घेतल्यानंतर मिलिंद भारंबे यांनी सर्वाधिक इंटरनेट वापरकर्ता शहराचा धोका लक्षात घेऊन सायबर गुन्हे रोखण्यासाठी नवी मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र सायबर सेल स्थापन करण्याची आखणी केली. यानूसार सध्या प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर अँड फायनान्शियल युनिटमध्ये (सीआयएफआय) तरुण पोलीस शिपाई, पोलीस उपनिरीक्षक काम करताना दिसतात. या कर्मचा-यांना सायबर सिक्युरिटीचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. स्वतंत्र सायबर प्रयोगशाळा (सायबर लॅब) उभारण्यात आली.

राज्यातील प्रथमच नवी मुंबई पोलीस दलात फायनान्शियल इंटेलिजन्स (एफ.वाय.) युनिट स्थापन करण्यात आले. दामदुप्पट योजनेवर याच विभागाकडून गुन्हा घडण्यापूर्वी लक्ष्य ठेवण्याचे काम सोपविण्यात आले. जनजागृती, तातडीने तक्रार दाखल करून कारवाई यामुळे यंदा २३६ गुन्ह्यांपैकी ७२ गुन्हे उघडकीस आणण्यात आले. त्यामध्ये ९५ संशय़ीत आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ५ कोटी १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी दिली. 

सायबर फसवणूकीबाबत तातडीची माहिती देण्यासाठी नवी मुंबई पोलीस दलाच्या हेल्पलाईन ८८२८११२११२ यावर पिडीतांनी तातडीने संपर्क साधणे गरजेचे आहे. यावर संपर्क साधल्यावर नेमके पुढे काय करावे याची माहिती पिडीताला दिली जाते. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात बनावट कागदपत्रांव्दारे बॅंकखाते बनविणारी टोळीला नवी मुंबई पोलिसांनी गजाआड केले. यावेळी पोलिसांनी पॅन कार्ड, आधारकार्ड, लिंक मोबाईल नंबर किंवा बँक खात्याची माहिती, अनोळखी व्यक्तीला विनाकारण वापरण्याकरीता देवु नये. इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणूक करणारे गुन्हेगार फसवणुक रक्कम घेण्याकरीता बँक खात्यांचा वापर करु शकतील असे आवाहन गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांनी केले होते.