नवी मुंबई : रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने थोडा अडथळा आणला खरा; मात्र सकाळपासूनच शहरात दहीहंडीचा उत्साह ओसंडून वाहताना पहायला मिळाला. ठिकठिकाणी ढोल-ताशांचा गजर, डीजेवर वाजणाऱ्या गाण्यांवर थिरकणारे बालगोपाल आणि “गोविंदा आलाऽऽ रे आला!”च्या आरोळ्या देत एकावर एक रचलेल्या थरारक मानवी मनोऱ्यांनी नवी मुंबईतील दहीहंडीचा उत्साह द्विगुणित केला.
ऐरोली, नेरुळ, वाशी, बेलापूर, घणसोलीसह शहरातील बहुतेक भागांत सकाळपासूनच दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली. पावसात भिजत, घसरड्या रस्त्यांवर थरावर थर रचत गोविंदांनी अनेक हंड्या फोडल्या. उंच मनोरे रचताना प्रत्येक थरावर नागरिकांचा जयघोष घुमत होता. विशेष म्हणजे यंदा महिला गोविंदा पथकांचीही चांगलीच रंगत पाहायला मिळाली.
विशेषतः शहरातील कोळीवाड्यांपासून जुन्या वसाहतींपर्यंत गावकीच्या हंड्यांमध्ये पारंपरिक साज टिकून राहिल्याचे पहायला मिळाले. एक गाव–एक हंडी या प्रथेनुसार सर्व गावकरी एकत्र जमले आणि सामूहिकरीत्या उत्सव साजरा केला. काही ठिकाणी चोर हंडी, तर काही ठिकाणी डोळ्यांवर पट्टी बांधून फोडण्यात आलेल्या हंड्या नागरिकांसाठी विशेष आकर्षणाचा विषय ठरला.
शहरातील अनेक मोठ्या दहीहंड्यांमध्ये लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आली होती. ऐरोलीतील ११ लाखांच्या हंडीसह सानपाडा, घणसोली, वाशी येथील हंड्यांना तरुण गोविंद पथकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पावसाचा विचार न करता अनेक पथकांनी ८ ते ९ थरांचे मानवी मनोरे उभारून आपले कसब दाखवले.
गर्दीचा अंदाज घेऊन पोलिसांनी सकाळपासूनच सर्व ठिकाणी बंदोबस्त ठेवला. वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक शाखेचे अधिकारी रस्त्यावर तैनात होते.
पावसाचा अडथळा, राजकीय रंग, लाखोंची बक्षिसे आणि पारंपरिक गावकीच्या हंड्या — या सगळ्यांचा मिलाफ होत नवी मुंबईत यंदाची दहीहंडी उत्साहात पार पडली. गोविंदांच्या थरांबरोबरच शहरातील उत्सवप्रिय नागरिकांचा उत्साहही उंचावला होता.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाढवला गोविंदांचा उत्साह
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दहीहंडी उत्सवाला विशेष महत्व प्राप्त झाले असून, प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. यंदा ऐरोली येथे सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावून गोविंदांचा उत्साह वाढवला. या दहीहंडी उत्सवात ९० हून अधिक गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी तुफान राजकीय टोलेबाजी करत “महायुतीने जशी विधानसभेला रेकॉर्ड ब्रेक हंडी फोडली तशी यंदा महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेनेही हंडी फोडावी.” असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजक व शिवसेना उपनेते विजय चौगुले यांना केले.
लाडक्या बहिणींना हमी
विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी दिलेल्या आशीर्वादाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्व लाडक्या बहिणींचे आभार मानले. “विधान सभेत लाडक्या बहिणींनी फिरवली जादूची कांडी आणि विरोधकांची उडवून टाकली दांडी.” असे म्हणत, महाराष्ट्रातील राज्य सरकार जनतेसाठी विकासाभिमुख आणि कल्याणकारी योजना राबवत असून, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही.” अशी हमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यानिमित्ताने लाडक्या बहिणींना दिली.
घणसोलीत स्टेज खचला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ऐरोलीहून घणसोली सेक्टर ९ येथे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात पोहोचले असता शिवसेना कार्यकर्त्यांकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी स्टेजवरून गोविंदांना संबोधित करून निघत असताना अचानकपणे स्टेज खचल्याची घटना घडली. सुदैवाने उपमुख्यमंत्री शिंदे आणि स्टेजवर उपस्थितांपैकी कोणालाही दुखापत झालेली नाही. स्टेजवर क्षमतेपेक्षा जास्त गर्दी जमल्याने स्टेज खचल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.