लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : वाशीतील रखडलेल्या कम्युनिटी सेंटर प्रकल्पाच्या ठिकाणी एक मृतदेह आढळून आला आहे. मृतदेख खोल खड्डय़ात असल्याने तो बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाची मदत घेण्यात येत आहे. हा प्रकार सोमवारी संध्याकाळी उघडकीस आला. हा आमच्या कामगाराचा मृतदेह नाही असे पालिकेने सांगितले असले तरीही ढिसाळ सुरक्षा व्यवस्था समोर आली आहे. घटनेबाबत चौकशी अहवाल मागवण्यात आला आहे.

सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास वाशी पोलीस ठाणे शेजारी असलेल्या कम्युनिटी सेंटरमध्ये हा प्रकार घडला. काही वर्षांपूर्वी या कम्युनिटी सेंटरची इमारत जीर्ण झाल्याने पाडण्यात आली होती. ती पुन्हा बांधत असताना त्यात काही तांत्रिक चुका झाल्याने पुन्हा नव्याने बांधकाम सुरू करण्यात आले. याच निर्माणाधीन इमारतीमध्ये उद्वाहनासाठी खोदण्यात आलेल्या खड्डय़ात पाणी साठले आहे. त्यात एक मृतदेह तरंगत असल्याचे काही कामगारांना आढळले.

ही माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र मृतदेह खोल खड्डय़ात असल्याने अग्निशमन दलाला प्राचारण करण्यात आले आहे, अशी माहिती वाशी पोलिसांनी दिली.

या ठिकाणी २४ तास सुरक्षा रक्षक असतात, तरीही बाहेरील मृतदेह आला कसा हा प्रश्न उपस्थित होत असून कोणीतरी मृतदेह आणून टाकल्याचा दावा पालिका करीत आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही नसून संध्याकाळी काम सुरू असेल तरच दिवे लावले जातात. अन्यथा काळोख असतो.

सदर मृतदेह तेथे काम करणाऱ्या कामगाराचा नसून बाहेरून कोणीतरी आणून टाकला असल्याचा संशय कंत्राटदाराने व्यक्त केला आहे. या ठिकाणी सुरक्ष रक्षक २४ तास तैनात आहेत. तरीही हा प्रकार घडला आहे. पोलीस तपासात सर्व समोर येईल.
-सुरेंद्र पाटील, शहर अभियंता