लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल: पनवेल महापालिका परिसरात डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असून गेल्या दीड महिन्यात आरोग्य विभागाकडे आलेल्या माहितीनुसार डेंग्यूचे १४८ तर मलेरियाचे ७९ रुग्ण आढळले आहेत. ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे सर्वाधिक १२६ तर मलेरियाचे ४२ रुग्ण आढळले होते. सप्टेंबर महिन्यात १८ दिवसांत डेंग्यूचे २२ तर मलेरियाचे ३७ रुग्ण आढळले आहेत. खारघर तसेच कळंबोली या उपनगरांत हे रुग्ण सर्वाधिक आढळत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.

दरम्यान, मागील नऊ महिन्यांच्या अवधीत स्वाइन फ्लूचे सहा रुग्ण खारघर आणि रोंहिजन भागात आढळले आहेत. या रुग्णांचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक होते. त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपाचार झाल्यावर ते बरे झाल्याची माहिती पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली.

हेही वाचा… बैठ्या घरांच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा? पार्किंगची अट काढावी यासाठी महापालिकेची पुनर्विचार याचिका

महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये नवीन पनवेलमध्ये डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. नवीन पनवेलपाठोपाठ खारघर, कामोठे, कळंबोली या उपनगरांमध्ये डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढले आहेत. खारघर, नवीन पनवेल, कळंबोली आणि कामोठे या चार उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात नवी बांधकामे उभी राहात असल्याने या ठिकाणी डास उत्पत्ती स्थानांमध्ये वाढ झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली. अनेक घरांमधील कुंड्यांमध्येही अळ्या मिळत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

जुलै महिन्यापासूनच वाढ

जुलै महिन्यात ११५ आणि ऑगस्ट महिन्यात १२६ अशा प्रकारे दोन महिन्यांत २४१ डेंग्यूचे रुग्ण सापडले आहेत. कामोठे वसाहतीमधील सेक्टर २१ मधील गुरुदेव हाइट्स या इमारतीमध्ये राहणारी १७ वर्षीय विद्यार्थिनीचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. महापालिका परिसरातील खारघर, कामोठे व कळंबोली या उपनगरांमध्ये अजूनही अनेक बालकांमध्ये ताप, डोकेदुखी व पोटदुखी या आजारांसोबत साथरोग असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रहिवाशांनी भीतीच्या सावटाखाली राहण्याऐवजी पनवेल महापालिका तसेच सरकारी आरोग्य विभागाने दिलेल्या प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. स्वाइन फ्लू आजाराचे जानेवारी ते सप्टेंबर या महिन्यात ६ रुग्ण आढळले आहेत. हे रुग्ण आता बरे आहेत. याशिवाय महापालिका डास उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्यासाठी सातत्याने मोहीम राबवीत आहे. – डॉ. आनंद गोसावी, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, पनवेल पालिका