नवी मुंबई : सालाबाद प्रमाणे पावसाळ्या पूर्वी कामे करून लाखोंचा निधी खर्च करूनही या वर्षीही शीव पनवेल मार्गावर मोठं मोठे खड्डे खास करून उड्डाणपुलावर पडले आहेत. याच खड्ड्यामुळे रविवारी रात्री प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. शेवटी वाहतूक पोलिसांनी बेलापूर खिंडीतील उड्डाणपुलावरील खड्डे बुजवले आणि त्या नंतर हळू हळू वाहतूक कोंडी सुटून रस्ता सुरळलीत झाला.
केवळ नवी मुंबईतीलच नव्हे तर राज्यातील सर्वाधिक वर्दळ पैकी असणारा मार्ग म्हणून शीव पनवेल महामार्ग समजला जातो. राज्याची राजधानी मुंबईला राज्याशी जोडणारा मार्ग म्हणून या मार्गाची ओळख आहे. शीव पासून पनवेल पर्यंत असा २५ किलोमीटरचा हा मार्ग असून यातील १२ किलोमीटरचा मार्ग हा नवी मुंबई आणि पनवेल भागात आहे. या ठिकाणी ८ उड्डाणपूल आहेत. या मार्गावर सिमेंट काँक्रीटीकरण झाले असले तरी उड्डाणपुलावर मात्र बहुतांश ठिकाणी डांबरी करण आहे. त्यामुळे पावसाळ्यात मोठं मोठी खड्डे पडतात. याच कारणाने पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून दुरुस्ती केली जाते. मात्र पावसामुळे पुन्हा खड्डे पडून निधी वाहून जातो. याच कारणाने गेली कित्येक वर्ष सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या कामाच्या दर्जा बाबत शंका उपस्थित केली जाते.
या वर्षीयी खिंडीतील उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. रात्रीच्या वेळी प्रवासी बस माल वाहतूक जड अवजड वाहने आणि प्रवासी हलकी वाहने यांची संख्या प्रचंड असते त्यात खिंडीतील उड्डाण पुलावर खड्डे पडल्याने रविवारी रात्री वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे सुमारे पाच किलोमीटर पर्यंत दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडी फोडायची असेल तर उड्डाणपुलावरील मोठी खड्डे बुजवणे आवश्यक होते.
मात्र रात्री सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवणे त्यांनी साहित्य सह वाहतूक कोंडीतून मार्ग काढत येणे हे वेळखाऊ असल्याने शेवटी महामार्गावर पावसाळ्यामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांच्या समस्येवर वाहतूक पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेत, उरण ब्रिजवरील खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या समस्येवर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांचे कर्मचारी वाहतूक हवालदार जीतू पाटील आणि हवालदार आकाश करपे यांनी स्वतःहून पुढाकार घेतला.
त्यांनी खडी व राडारोडा ओळखीतून उपलब्ध करीत उड्डाणपुलावरील खड्डे बुजवले. त्यांच्या या कृतीमुळे वाहतूक कोंडीतुन वाहनांची सुटका झाली आणि प्रवाशांचा त्रास कमी झाला.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रतिक्रिया मिळू शकली नाही यापूर्वी हि ठाणे बेलापूर मार्गावर रबाळे उड्डाणपुलावर अशीच स्थिती निर्माण झाली होती. त्या वेळीही वाहतूक हवालदार सुनील नरळे आणि स्वप्नील काशीद यांनी स्वतः फावडे हातात घेऊन खड्डे बुजवले होते.