वाहनचालकांकडून संताप; सकाळच्या सत्रात वाशीतही वाहतूक संथगतीने

नवी मुंबई : बेलापूर येथील सिडको भवनवर आंदोलन होणार असल्याने वाहतूक पोलिसांनी शीव-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोपरखरणेमार्गे शिळफाटय़ावरून वळविण्यात आली होती. पामबीच मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू राहणार होती, मात्र ऐनवेळी वाहतुकीत बदल केल्याने या मार्गावर एनआरआय संकुलाजवळ वाहतूक अडवण्यात आली. त्यामुळे काहीसा गोंधळ उडाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील या नावाच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी गुरुवारी अखेर आंदोलन केले. मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, मात्र लोकभावनेचा आदर करीत सभेला परवानगी देण्यात आली. पामबीच रस्त्यावर महापालिका मुख्यालय इमारतीनजीक नेरुळ-उरण रेल्वेमार्गाच्या उड्डाणपुलाखाली या सभेची तयारी ऐनवेळी करण्यात आली. त्यामुळे पामबीच मार्गावरील वाहतुकीत ऐनवेळी बदल करण्यात आला. विशेष म्हणजे एनआरआय सिग्नलपर्यंतच वाहने येऊ  दिली जात होती. वास्तविक नियोजनाप्रमाणे हा मार्ग किल्ले गावठाणपर्यंत सुरू होता. त्यामुळे वाहनचालकांनी या मार्गावरून येणे पसंत केले होते. मात्र एनआरआय सिग्नलवर वाहने अडविण्यात आली.  वास्तविक बेलापूरच्या दिशेने येणारी वाहने सानपाडा सिग्नलवरच अडवली असती तर हा गोंधळ उडाला नसता.

टोलनाक्यापासून वाशी प्लाझापर्यंत वाहनांच्या रांगा

सकाळपासून वाशी पथकर नाक्यापासून वाशी प्लाझापर्यंत सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. त्याचबरोबर कळंबोली सर्कल, तळोजा, महापे उड्डाणपूल, ऐरोली सेक्टर पाच, दिवा नाका येथेही वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलीस नेमक्या ठिकाणीच असल्याने वाहतूक संथगतीने सुरू होती.

दुपारनंतर वाहतूक पूर्ववत

पावणेचारनंतर सर्व रस्ते खुले करण्यात आल्यानंतर वाहनचालकांना दिलासा मिळाला. विशेष म्हणजे जड अवजड वाहने नसल्याने गैरसोय टळली. रस्ते खुले केल्यानंतर  उरण फाटा ते किल्ले गावठाण उड्डाणपूल ते जेएनपीटी मार्गावर सुमारे दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

आंदोलन शांततेत पार पडले. करोनामुळे मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती तसेच सभेलाही परवानगी देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे तांत्रिक माहिती गोळा केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात येणार आहे. योग्य ती खबरदारी घेतली.

बिपिनकुमार सिंह, आयुक्त, नवी मुंबई पोलीस 

अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली, मात्र सर्वच ठिकाणी वाहतूक पोलीस असल्याने वाहतूक कोंडी फार काळ राहिली नाही. दुपारी तीनच्या सुमारास रस्ते खुले करण्यात आले. कुठेही अपघात वा अनुचित प्रकार घडला नाही.

-पुरुषोत्तम कराड, पोलीस उपायुक्त, वाहतूक

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Detention palm beach route meeting allowed time ssh
First published on: 25-06-2021 at 00:43 IST