६०० वर्ग अत्याधुनिक; विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरीही लवकरच

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्षभर वारंवार आश्वासन देऊनही प्रत्यक्षात सुरू होत नसलेल्या डिजिटल शिक्षणाचा श्रीगणेशा अखेर शनिवारी झाला. आता महापालिकेच्या ४२ हजार विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळणार आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थी पटसंख्या ही दरवर्षी वाढती आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. ५३ प्राथमिक व १८ माध्यमिक शाळा आहेत. तसेच कोपरखैरणे व सीवूडस येथे नव्याने दोन सीबीएसई शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. आता या सर्वच शाळांमध्ये डिजिटल सुविधा सुरू करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून आज उद्या करीत ही प्रणाली रखडली होती.

बंगलोर येथील कंपनीकडून यंत्रणा घेतली असून ६०० वर्ग डिजिटल करण्यात आले आहेत. यामध्ये प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर व डिजिटल बोर्ड व ईआरपी सिस्टीम राबविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांने वर्गात प्रवेश केल्यानंतर त्याची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी नोंद होणार आहे. पालकांना आपले मूल शाळेत आल्याचा एसएमएस मिळणार आहे.

पाच वर्षांच्या कालावधीत जर अभ्यासक्रम बदलला तर नवीन अभ्यासक्रमही डिजिटल करून देण्याची अट निविदेत आहे. त्याचप्रमाणे या सर्व अत्याधुनिक शिक्षणव्यवस्थेसाठी येणारा खर्चही ५ वर्षांत टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेतील शाळांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली असून वायफाय सुविधा  देण्यात आली आहे.

खासगी शाळांपेक्षाही अद्ययावत डिजिटल शिक्षणाची चांगली व्यवस्था महापालिका शाळांत करण्यात आली आहे. हा माझा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. माझ्या पालिकेतील शाळेतील प्रत्येक मुलाला डिजिटल शिक्षण मिळालेच पाहिजे हा लोकप्रतिनिधींसह माझाही आग्रह होता. त्याप्रमाणे ही सुविधा शनिवारपासून सुरू करण्यात आली आहे.     – डॉ. रामास्वामी एन, आयुक्त नवी मुंबई महापालिका

ऑनलाइन सुविधा

  • प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर व डिजीटल बोर्ड.
  • विद्यार्थी शाळेत आल्यानंतर पालकांना एसएमएस.
  • अभ्यासक्रम बदलल्यास नव्या अभ्यासक्र उपलब्ध करुन देणार.
  • शाळांमध्ये वाय फाय जोडणीद्वारे ऑनलाईन सुविधा.
  • प्राथमिक : ३६५०१
  • माध्यमिक : ५२५८
  • एकूण : ४१७५९
  • विद्यार्थ्यांना डिजीटल शिक्षण
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Digital teaching in navi mumbai
First published on: 25-12-2018 at 01:09 IST