जागतिक आर्थिक मंदीचे पडसाद या वर्षी घर, वाहन आणि सोने या प्रमुख खरेदीवर काही प्रमाणात उमटल्याचे दिसून येत आहे. पनवेल वगळता नवी मुंबई, उरण भागांत दिवाळीच्या मुहुर्तावर खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली असल्याचे जाणवले आहे. त्यामुळे बाजारात ‘थोडी खुशी, जादा गम’ असल्याचे चित्र असून व्यापारी व बांधकाम व्यावसायिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दसरा, दिवाळी सण म्हणजे खरेदी असे एक समीकरण प्रचलित झाले आहे. त्यामुळे गरिबातील गरीब आणि श्रीमंतातील श्रीमंत हे सण मोठय़ा उत्साहात साजरे करीत असल्याचे दिसून येते. मागील काही महिन्यांपासून वाढलेली महागाई आणि बाजारात घटलेली आर्थिक उलाढाल यामुळे सर्वसाधारण नागरिक खरेदी-विक्रीपासून दूर गेल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळेच विकासक अनेक सवलती देत असताना ग्राहक घरखरेदी करताना हात आखडता घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यात व्याजाचे दर आणखी कमी होण्याची वाट पाहिली जात आहे. नवी मुंबईतील नेरुळ, तुर्भे, सीबीडी येथील घर नोंदणी कार्यालयात गतवर्षीपेक्षा कमी प्रतिसाद असल्याचे सांगण्यात आले आहे, कोपरखैरणे येथे मात्र गतवर्षीपेक्षा थोडी जास्त घरखरेदी झालेली आढळून आली. गतवर्षी हा आकडा ६,६९४ होता, तो या वर्षी ७,९३७ आहे. वाशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात या वर्षी पंचवीस टक्के वाहन नोंदणी घटल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पनवेलमध्ये मात्र वाहन खरेदीच्या नावाने चांगभले असून जमीन विक्रीतून आलेल्या पैशातून वाहन खरेदीची हौस ग्रामस्थ भागवीत असल्याचे दिसून आले. यात आलिशान गाडय़ांचा जास्त भरणा आहे. सोने खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे सोनारांनी सांगितले. पाच हजार रुपये प्रति तोळा सोने स्वस्त होऊनही सोनारांच्या दुकानात खरेदीदारांची म्हणावी अशी वर्दळ नाही.

परवडणारी घरे हवीत
आर्थिक मंदीचे सावट बांधकाम व्यावसायिकांना सर्वाधिक जाणवत आहे. मागील काही वर्षांपासून बांधकाम व्यावसायिकांनी केवळ मोठय़ा घरांच्या बांधकामाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे बाजारात परवडणारी घरे नाहीत. आज नोकरदार माणून घर घेऊ इच्छितो, पण त्याला घरे उपलब्ध नाहीत. सिडकोने नैना प्रकल्प जाहीर केला आहे. त्या ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांनी अगोदरच जमिनी विकत घेऊन ठेवलेल्या आहेत. सिडकोने या ठिकाणी बांधकामांची परवानगी लवकर दिली तर परवडणाऱ्या घरांची निर्मिती मोठय़ा प्रमाणात होऊ शकते. या घरांना मागणी आहे. मोठय़ा घरांना आता फारशी मागणी राहिलेली नाही.
– धरम कारिया, अध्यक्ष, बिल्डर असोसिएशन ऑफ नवी मुंबई<br /> सोने स्वस्त होण्याची प्रतीक्षा
मागील वर्षांच्या तुलनेत सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी आहे. दोन महिन्यांपासून तर बाजारात खऱ्या अर्थाने मंदी जाणवू लागली आहे. सर्वसाधारणपणे दसरा झाल्यानंतर लगेच ग्राहक दिवाळीतील सोने घडविण्यासाठी आरक्षण करून ठेवत असत, पण आज दिवाळीला केवळ सहा दिवस राहिलेले असतानादेखील सोने घडविण्यासाठी फारशा ऑर्डर्स नाहीत. त्यात काही दिवसांपूर्वी सोने पाच हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे ते आणखी कमी होईल याची कदाचित ग्राहक वाट पाहत असेल असे दिसून येते.
सुनील पी. एस. जोयआलुक्कास
ज्वेलर्स, वाशी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali festival shopping
First published on: 06-11-2015 at 07:36 IST