अलिबाग : अलिबाग नगर पालिकेच्या डंपिंग ग्राउंड परिसरात लावलेल्या आगीमुळे रात्रीपासून शहर आणि लगतच्या परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे रात्रीपासूनच अलिबागकरांचा श्वास कोंडला होता. सकाळी दहा वाजेपर्यंत शहरातील अनेक भागांत धुराचे साम्राज्य पसरले होते. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

घन कचऱ्याचे व्यवस्थापन करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे. मात्र अलिबाग जवळील गोविंद बंदर परिसरात नगरपालिका आणि आसपासच्या ग्रामपंचायती खाडीलगतच्या परिसरात कचरा टाकतात. कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता बरेचदा कचऱ्याला आग लावली जाते ज्यामुळे आसपासच्या परिसरात धुराचे साम्राज्य पसरते. धुरामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन वयोवृद्ध आणि लहान मुलांना त्रास सहन करावा लागतो.

हेही वाचा – नवी मुंबई : वादग्रस्त सायकल ट्रॅकची रुंदी ३.५० मीटर; प्रत्यक्षात अनेक ठिकाणी रुंदी २.५० मीटर

संध्याकाळी या डंपिंग ग्राउंड परिसरात आग लागली होती. ज्यामुळे धुराचे लोट शहरालगत परिसरात पसरले होते. मध्यरात्रीच्या वेळी कोंदट वातावरण तयार झाले होते. सकाळीही धूर आणि धुकाची चादर संपूर्ण शहरावर पसरली होती. धुरामुळे डोळे चुरचुरणे, धुरकट वासाचा त्रास जाणवत होता. दहा वाजेपर्यंत हीच परिस्थिती कायम होती. अस्थमा आणि श्वसनाचे विकार असलेल्यांना या धुराचा प्रचंड त्रास जाणवत होता. त्यामुळे डंपिंग ग्राउंड परिसरात लागलेल्या आगीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे. तसेच, आग लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

अलिबाग शहरात सकाळी सर्वत्र धुर पसरला होता. जो दम्याच्या रुग्णांसाठी अतिशय त्रासदायक असतो. लहान मुलांनाही या धुराचा प्रचंड त्रास होतो. सर्दी खोकल्याचा त्रास अधिकच बळावू शकतो. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने हिवाळ्यात कचरा जाळण्याचे प्रकार थांबवायला हवेत, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. विनायक पाटील म्हणाले.

हेही वाचा – कामोठे येथे महानगर गॅसच्या स्फोटात कामगारांसह कुटूंब जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अलिबाग नगरपालिका दरवर्षी कचरा व्यवस्थापनासाठी साडेसहा कोटी रुपयांचा खर्च करते. कचरा व्यवस्थापनासाठी येवढा निधी खर्च करूनही जर आग लावून कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असेल, आणि जनतेचे आरोग्य धोक्यात येत आहे ही खेदजनक बाब आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई व्हायला हवी, असे सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत म्हणाले.

अज्ञातांकडून ही आग लावली गेली असल्याचा संषय असून, सदर आग विझविण्यासाठी अलिबाग नगरपालिकेचे कर्मचारी रात्रीपासूनच प्रयत्नशील आहेत, असे अलिबाग नगर पालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी नामदेव जाधव म्हणाले.