स्वतंत्र कचराकुंडय़ा ठेवणारी पहिलीच महापालिका; वर्दळीच्या भागांचे सर्वेक्षण करणार
घनकचरा व्यवस्थापनात वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या नवी मुंबई महापालिकेने शहरातील वर्दळीच्या तीन ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कचऱ्यासाठी कुंडय़ा बसविल्यानंतर आता शहरातील १०० ठिकाणांचे सर्वेक्षण करून तिथेही ई-कचऱ्यासाठी लाल रंगाच्या कचराकुंडय़ा बसवण्यात येणार आहेत. राज्यात अशा प्रकारे ई-कचराकुंडय़ा बसविणारी नवी मुंबई महापालिका ही पहिलीच महापालिका आहे. नवी मुंबईत वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालये मोठय़ा प्रमाणात आहेत. त्या ठिकाणी या कचराकुंडय़ा प्राधान्याने बसविल्या जाणार आहेत.
पालिकेने केंद्र सरकारच्या घनकचरा व्यवस्थापन २०१६ उपक्रमाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. तुर्भे येथे कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने करण्यात येणारी प्रक्रिया ही पालिकेची जमेची बाजू आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्र, शौचालय, हगणदारी मुक्त शहर अशा ठोस उपाययोजनांमुळे नवी मुंबई हे राज्यातील पहिले स्वच्छ शहर ठरले आहे. सर्व सोसायटय़ांना ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे ग्रामीण व झोपडपट्टी भागात हे अभियान सुरू करण्यात आले आहे. शहरात खूप मोठय़ा प्रमाणात ई-कचरा जमा होतो. त्यात सर्व प्रकारच्या निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश असतो. टीव्ही संच, जुन्या वाहनांचे सुटे भाग, मोबाइल फोनचे चार्जर, हेडफोन, संगणकाचे विविध भाग इत्यादींचा त्यात समावेश होतो. त्यासाठी मोक्याच्या ठिकाणी लाल कचरा कुंडी ठेवली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्याची सुरवात पालिकेने वाशी येथील इनऑर्बिट मॉल, नेरुळ येथील वंडर्स पार्क आणि बेलापूर पालिका मुख्यालय या तीन वर्दळीच्या ठिकाणी केली आहे. ई-कचरा निर्माण होणाऱ्या १०० ठिकाणी या कचरा कुंडय़ा लावण्यात येतील. यासाठी एका खासगी कंपनी बरोबर सामंजस्य करार करण्यात आला असून ही कंपनी हे खराब इलेट्रोनिक्स साहित्य जमा करून घेऊन जाणार आहे. इलेक्ट्रोनिक्स कचरा कुंडी ठेवणारी नवी मुंबई ही राज्यातील पहिली पालिका ठरल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
ई-कचऱ्याचे वर्गीकरण अत्यावश्यक
निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू इतर घनकचऱ्याबरोबर टाकल्यास त्या जल, वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरतात. हा ई-कचरा वेगळा केल्यास त्यातील काही सुटय़ा भागांचा पुनर्वापर करणे शक्य होते. ई-कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांना तो विकता येऊ शकतो.
नवी मुंबई पालिका घनकचरा व्यवस्थापनाची काटेकोर अंमलबजावणी करत आहे. इलेक्ट्रोनिक्स साहित्याचे वर्गीकरणही करण्यात येऊ लागले आहे. तीन ठिकाणी अशा ई-कचरा कुंडय़ा बसविण्यात आल्या आहेत. शहरात १०० ठिकाणांचे सर्वेक्षण करून अशा ई-कचरा कुंडय़ा बसविल्या जाणार आहेत.
– तुषार पवार, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) नवी मुंबई पालिका