चिरनेर जंगलात ‘क्युलेक्स’ डासांच्या उत्पत्तीमुळे धोका वाढला

वाढत्या घाणीच्या साम्राज्यामुळे उरण तालुक्यात डासांची पैदास वाढली असून त्यामुळे हत्तीरोगासारखा असाध्य व्याधीची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरू लागले आहे. आरोग्य विभागाने याची दखल घेऊन उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या रोगाच्या रुग्णांची संख्या चिरनेर परिसरात आहे. तर तालुका आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असल्याचा दावा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे.

चिरनेर व करंजा परिसरातील डोंगराळ परिसरात हत्ती रोगाला कारणीभूत ठरणाऱ्या ‘क्युलेक्स’ या डासांची वाढ झाली आहे. त्यामुळे या परिसरात अशा प्रकारच्या आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची वाढ होत आहे. एकीकडे आरोग्य विभागाकडून त्वचा आणि कुष्ठरोगांच्या प्रतिबंधासाठी विभागाची शोध मोहीम सुरू आहे. अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविल्याचा देखावा केला जातो. प्रत्यक्षात मात्र घाणीमुळे अनेक आजार होऊ लागले आहेत. या घाणीमुळे हत्तीरोग होणाऱ्या डासांची निर्मिती होते. उरण तालुक्यातील औद्योगिकीकरणाचा मोठा फटका येथील जनजीवनाला बसत आहे. येथील पर्यावरणाचा समतोल ढासळला गेल्याने साथीच्या रोगांचा प्रसार होत आहे.

उरण विभागातील २७ रुग्णांवर हत्तीरोग झाल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे; मात्र हत्ती रोगाला अटकाव करण्यासाठी स्वच्छता ठेवावी. त्यामुळे क्युलेक्स डास निर्मितीला आळा बसतो. 

-डॉ. सचिन संकपाळ, तालुका आरोग्य अधिकारी, उरण.

* ‘क्युलेक्स’ डास चावल्यानंतर महिलांच्या अंगाला खाज व सूज.

* पुरुषांच्या पंडुकोषावर परिणाम होतो.

* चाव्यानंतर खाज आणि तापाची लक्षणे

*  खाज आणि तापाची लक्षणे आढळल्यास ‘डीईसी’ हे औषध दिले जाते. यासाठी चौदा दिवस नियमित उपचार केले जातात. त्यामुळे हत्तीरोगाला प्रतिबंध घालता येतो.