रिक्षा व खासगी वाहतुकीशिवाय पर्याय नसल्याने गैरसोय

नवी मुंबई : ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीत लहान-मोठे उद्योगींची संख्या चार हजारांपर्यंत असून त्या ठिकाणी सहा लाख नोकरदार काम करीत आहेत. यातील काही कंपन्यांनी वाहतुकीसाठी स्वत:ची वाहन व्यवस्था केली आहे. मात्र बहुतांश नोकरदारांनी सार्वजनिक वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र या परिसरात अंतर्गत रस्त्यांवर परिवहनची बससेवा दिली जात नाही. त्यामुळे त्यांना रिक्षा किंवा खासगी सेवेवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यांच्याकडून मनमानी दर आकारले जात असल्याने हा आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमआयडीसीत बहुतांश नोकरदार हे मध्यमवर्गीय आहेत. महापे, शिळ फाटा व्यतिरिक्त कुठेही परिवहन बसने ये-जा करण्याची सुविधा उपलब्ध नाही. काही ठिकाणी बससेवा दिली जात असली तर फे ऱ्या अत्यल्प व अवेळी आहेत.

ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टय़ातील विविध ठिकाणच्या औद्योगिक वसाहतीची दुर्दशा निमसरकारी-प्रशासनिक उदासीनतेने सर्वच क्षेत्रांत झाली आहे. यात वाहतूक व्यवस्थासुद्धा आली. औद्योगिक वसाहतीत किमान साडेचार-पाच लाख लोकांना दैनंदिन प्रवासासाठी खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे.

नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या बस या थेट नवी मुंबईतून कल्याण-डोंबिवली, मुंब्रा, बदलापूर येथे जाणाऱ्या आहेत. या सर्व बस मुख्य मार्गावरून व ९० टक्के बस या मिलेनियम बिझनेस पार्क अर्थात महापे येथून जातात. त्यामुळे कामाच्या ठिकाणापर्यंत थेट जाता येत नाही. त्यामुळे रिक्षा किंवा खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागतो. दुसरा पर्याय नसल्याने मनमानी भाडे त्यांना द्यावे लागत आहे. घणसोली स्थानकातून महापे येथे जायचे असेल तर शअर रिक्षा २० रुपये आकारते. जर एकच प्रवासी असेल तर ४० ते ५० रुपये मोजावे लागतात. हीच परिस्थिती इतर ठिकाणीही आहे. त्यामुळे दिवसाला प्रवासापोटी नोकरदारांना ५० ते ८० रुपयांचा भुर्दंड बसतो.

५ ते २० किलोमीटपर्यंत कामाची ठिकाणे लांब आहेत. त्यामुळे पायी जाणे शक्य होत नाही. बस नसल्याने रिक्षाशिवाय पर्याय नसतो असे गेली ३० वर्षांपासून सुरक्षारक्षकाचे काम करणारे गोपाळ मिश्रा यांनी सांगितले. तर डोंबिवलीत राहणारे अजय महाले यांनी सांगितले की घर ते कंपनी व परतीचा प्रवास मला किमान तीन ते चार  तास लागतात. पर्याय नाही म्हणून शेवटी दुचाकी घेतली. आता २० ते २५ मिनिटांत कंपनीत पोहचतो. पेट्रोल इतके महाग झाले आहे की दुचाकी प्रवासही परवडत नाही. त्यामुळे बससेवा देणे गरजेचे आहे.

मी पूर्वी अंधेरी सिब्ज येथील आमच्या कंपनीत काम करीत होते. आता या औद्योगिक वसाहतीत येते. अंधेरी सिब्ज या औद्योगिक वसाहतीत एका ठिकाणाहून शहरातील कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी बेस्टच्या बस उपलब्ध होत्या. त्यामुळे अडचण होत नव्हती. आता वेळ व पैसा दोन्ही खर्च करावा लागतो, असे श्वेता शर्मा यांनी सांगितले.

एमआयडीसीत जायला-यायला बस नसल्याने गर्दीच्या वेळी खासगी वाहनांत स्वत:ला कोंबून प्रवास करावा लागतो. अगदी शेअर रिक्षात मागे चार व पुढे चालकाच्या दोन्ही बाजूंनी एक-एक प्रवासी असतो. तर अन्य प्रवासी वाहनांची हालत अशीच आहे. खासगी गाडय़ा मात्र औद्योगिक वसाहतीत कुठूनही मिळतात मग बस का नसते असा प्रश्न संगणकतज्ज्ञ अनंत कांबळे यांनी उपस्थित केला आहे.

बसथांब्यांवर आसन व्यवस्थेचा अभाव

एमआयडीसी भागात एकूण ५५ बस थांबे आहेत. यापैकी तुर्भे ते ठाणे अंतर्गत मार्ग व महापे ते शिळफाटा येथील बस थांब्यांची अवस्था त्यामानाने चांगली आहे. मात्र अन्य ठिकाणी बस थांब्यांसाठी उभे करण्यात आलेल्या बहुतांश शेल्टरची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. शेल्टरच्या आसपासचे गवत वाढलेले आहे, आसन व्यवस्था नसल्यात जमा आहे मुळात बस धावतच नसल्याने हा खर्च व्यर्थ झाला आहे.

शिरवणे, रबाळे, दिघा एमआयडीसीत सर्वाधिक गैरसोय औद्योगिक वसाहतीत एनएमएमटीचे ८ मार्ग आहेत तर ठाण्याला जाणारे तीन मार्ग औद्योगिक वसाहतीत केवळ मिलेनियम बिझनेस पार्कवरून जातात. असे एकूण ११ मार्ग आहेत. यात ११ क्रमांकाची बस सानपाडा ठाणे व्हाया एमआयडीसी तुर्भेपासून पुढे, तर ४१ व ६० या क्रमाकांच्या बसगाडय़ा वाशी-डोंबिवली व्हाया कोपरखैरणे, ४२ क्रमांकाची बस वाशी -डोंबिवली व्हाया तुर्भे, १२५ क्रमांकाची बस वातानुकूलित असून ती खारघर ते बोरीवली व्हाया तुर्भे एमआयडीसी अशी जाते. शिरवणे, रबाळे, दिघा एमआयडीसीमधून जाणारी एकही बस नाही.

ज्यांच्याकडे गाडी नाही वा ते घेऊ  शकत नाहीत अशा कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल या भागात येता-जाताना होतात. वाहतूक सेवा अतिशय वााईट आहे. अनेकदा कुशल कामगार असेल तर कंपन्यांना प्रवास भत्ता वेगळा द्यावा लागतो.

श्रीनिवासन, व्यवस्थापक, स्मॉल स्केल इंडस्ट्री असोसिएशन

रबाळे, ऐरोली, कोपरखैरणे, घणसोली रेल्वे स्टेशन ते त्या त्या ठिकाणचा एमआयडीसीचा भाग अशी रिंग रूट सेवा तीन वेळा सुरू केली. मात्र अत्यल्प प्रतिसाद असल्याने अखेर बंद करावी लागली. सध्याही रिंग रूट मार्गाचे सर्वेक्षण सुरू असून पाहणी करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

-शिरीष आरदवाड, व्यवस्थापक, एनएमएमटी

दिघा एमआयडीसीतील बस थांब्याची अवस्था.  (छायाचित्र : नरेंद्र वास्कर)

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Employees suffer due to lack of bus service navi mumbai ssh
First published on: 06-08-2021 at 00:32 IST