नवी मुंबई – ठाणेसह नवी मुंबई शहरांमध्ये खाडीकिनारा तसेच पाणथळींचे प्रमाण अधिक आहे. पर्यावरणप्रेमी पाणथळी संरक्षणाबाबत कायमच प्रयत्नशील असतात. अशातच नवी मुंबईत ठेकेदाराने मनमानी करत लोटस तलावात काही दिवसांपुर्वी १०० ट्रक भराव टाकण्यात आला होता. सिडकोने तलावातील भराव हटवून तलाव पुर्ववत केला नसल्याने पर्यावरणप्रेमींच्या वतीने पुन्हा एकदा येत्या रविवारी शांततापुर्ण रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली २२ जून रोजी नेरूळ येथील रेड रोझ अपार्टमेंटजवळील चौकातून सकाळी ८.३० वाजता निघणार आहे.

नवी मुंबई शहरास विविध पाणथळी आणि खाडीकिनारा लाभला आहे. या परिसरात जैवविविधता आढळून येत असते. नवी मुंबईतील डीपीएस तलाव संरक्षित पाणथळ म्हणून संरक्षित झाल्यानंतर चाणक्य आणि एनआरआय पाणथळ जागाही संरक्षित करण्यासाठी पर्यावरणप्रेमी आग्रही असल्याचे दिसून आले. असे असतानाच लोटस पाणथळ तलावात १०० ट्रक भराव टाकण्यात आला होता.

याप्रकरणाबाबत नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमी एकवटल्याचे दिसून आले. यामध्ये नवी मुंबई एन्हवायरमेंट, मॅंग्रोज सोल्जर, सजग नागरीक मंच, सेव्ह लोटस लेक, सीवूड्स दारावे मित्र मंडळ, यांच्यासह विविध पर्यावरणप्रेमी लोटस तलाव बचावासाठी आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी सीवूड्स सेक्टर २७ येथील लोटस तलाव येथे गेले दोन रविवार एकत्र शांततापुर्ण आंदोलन करत आहेत.

येत्या रविवारीही लोटस तलावाबाबत जनजागृती निर्माण व्हावी, आणि तलावाचे संवर्धना व्हावे या उद्देशाने रविवार, २२ जून रोजी सकाळी ८.३० वाजता नेरूळ सेक्टर २७ येथील रेड रोझ अपार्टमेंटजवळील चौकातून शांततापुर्ण रॅली काढण्यात येणार आहे.

जनजागृतीपर रॅलीचे आयोजन

लोटस तलाव बचावासाठी समाजमाध्यमावर पर्यावरणप्रेमी एकवटल्याचे दिसून येत आहे. या मध्ये व्हॉट्सॲपवर ‘रिस्टोर लोटस लेक’ हे चॅनेल तयार करण्यात आले आहे. यावर रॅली संदर्भात माहिती दिली जाते. त्याचप्रमाणे लोटस तलाव बचावासाठी आवाहन करण्यात येते. लोटस तलाव वाचवण्यासाठी सलग तिसऱ्या रविवारी जनजागृतीपर रॅलीचे आयोजन केले आहे.

तलावबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ही रॅली असणार आहे. तसेच हे तलावावरील भराव हटवून तो संरक्षित करावा हा मुख्य उद्देश असणार आहे. –सुनिल अग्रवाल, सेव्ह नवी मुंबई एन्व्हायरमेंट