नवी मुंबई : नेरूळ सेक्टर-१मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून निर्माण झालेल्या वादानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांची पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे. अमित ठाकरेंनी त्यांच्या समाजमाध्यमांवरील अकाउंटवरून आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया देत केलेल्या कृत्याचे समर्थन केले आहे. नेरूळ पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाल्याची प्रत समाजमाध्यमांवर पोस्ट करत त्यांनी, “महाराजांच्या सन्मानासाठी लढणं जर गुन्हा मानला जात असेल तर, भविष्यातही असे हजारो गुन्हे मी अभिमानाने करेन,” असे रोखठोकपणे म्हटले आहे.
रविवारी दुपारी मनसेचे नेते अमित ठाकरे व कार्यकर्त्यांनी मिळून महापालिकेची अधिकृत परवानगी नसतानाही नेरूळ चौकातील शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे अनावरण केले. पुतळ्यावरील मळके कापड काढून महाराजांचे चरण पाण्याने धुत पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. हा कार्यक्रम पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र कार्यकर्त्यांनी अनावरण पार पाडले. परिसरात मोठी गर्दी झाल्याने जमावबंदीचे उल्लंघन व अनधिकृतपणे अनावरण केल्याचा आरोप ठेवत नेरूळ पोलिसांनी अमित ठाकरे आणि ७० मनसैनिकांवर गुन्हा नोंदवला.
या प्रकरणापूर्वी चार महिन्यांहून अधिक काळ पुतळा झाकून ठेवण्यात आल्याने स्थानिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. महापालिकेच्या विविध विभागांकडून लोकार्पणाबाबत विसंगत माहिती मिळत असल्याने मनसेने अचानक अनावरणाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
नेरूळमध्ये १.०६ कोटी रुपयांचा खर्च करून चौकाचे सौंदर्यीकरण व पुतळा उभारण्यात आला असला तरी पुतळा लोकार्पणासाठी तयार असूनही अनावरण लांबवण्यात आल्याचा आरोप मनसे व शिवभक्तांकडून केला जात आहे.
रविवारी रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अमित ठाकरे यांनी समाजमाध्यमांवरून केलेल्या या रोखठोक पोस्टमुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांच्या या भूमिकेवर विरोधक आणि सरकार कोणता पवित्रा घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तर दुसरीकडे अमित ठाकरें पाठोपाठ मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष व प्रवक्ते गजानन काळे यांच्यावरही नेरुळ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या गुन्हा नोंद झाल्याची प्रत समाजमाध्यमावर पोस्ट करून, “इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो, पळणाऱ्यांचा नाही.” असे म्हटले आहे. तसेच, “आमच्यावर अशा शेकडो केसेस दाखल असून, अजून एक केस, गुन्हा दाखल झाला तर फरक पडत नाही.” अशी भूमिका गजानन काळे यांनी मांडली आहे. त्यामुळे नवी मुंबईत तापलेल्या राजकीय वातावरणात अधिकच भर पडली आहे.
दरम्यान, समाज माध्यमातूनही अमित ठाकरेंच्या या भूमिकेचे समर्थन केले जात आहे. तर पुतळ्याभोवतीची उर्वरित कामे पूर्ण झाल्यानंतरच अधिकृतपणे समारंभपूर्वक लोकार्पण करण्यात येईल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
