संतोष जाधव

नवीन कर्मचारी भरती; परवानग्यांसाठी अत्याधुनिक प्रणाली

मुंबई, भिवंडीमध्ये वारंवार आगीच्या घटना घडत असताना नवी मुंबई महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या सुमारे १४.५० लाख नवी मुंबईकरांची अग्निसुरक्षाही फक्त १३७ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. यामुळे अग्निशमन यंत्रणांच्या तपासणीत अडचणी येत आहेत. नवी वर्षांत मनुष्यबळासह हा विभाग अत्याधुनिक करण्यात येणार असून परवानग्यांसाठी अत्याधुनिक प्रणाली राबविण्यात येणार आहे.

नवी मुंबई महापालिकेची निर्मिती झाल्यानंतर १ एप्रिल १९९९ रोजी सिडकोकडून अग्निशमन विभाग नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला. सध्या महापालिकेत चार अग्शिशमन केंद्र असून कोपरखरणे येथील केंद्र तयार असून अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ते सुरू करण्यात आले नाही. १९ अग्निशमन गाडय़ा उपलब्ध आहेत. २०१० मध्ये शहरातील टोलेजंग इमारतींच्या सुरक्षेसाठी ६८ मीटर उंचीची ‘ब्रान्टो स्काय लिफ्ट’ ताफ्यात आहे. सध्या कमी कर्मचाऱ्यांमध्ये आगीची घटना घडताच तत्काळ कार्यवाही करण्याची आवश्यकता असते. अतिरिक्त ताण घेऊ न हा विभाग सुरक्षेसाठी प्रयत्न करीत आहे.

शहरात टोलेजंग इमारतींची संख्याही वाढत आहे, तर दुसरीकडे वाशीसह विविध भागातील पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला तर या उपनगराची लोकसंख्या वाढणार आहे. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर सुरक्षा अशक्य होणार आहे.

यासाठी महापालिकेने राबवलेल्या ४४८ पदांच्या भरतीमध्ये २६० पदे ही अग्निशमन विभागातील आहेत. त्यामुळे नव्या वर्षांत ही उर्वरित पदे भरली जाणार असून हा विभाग अधिक सक्षम करण्याचा मानस आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

नव्या भरती प्रक्रियेत २६० पदे अग्निशमन विभागाची आहेत. तसेच नवीन वर्षांत अग्निसुरक्षा तपासणी तसेच प्रत्येक ६ महिन्याने दिल्या जाणाऱ्या परवानगीसाठी नवी अत्याधुनिक प्रणाली राबविण्यात येणार आहे.

-डॉ.रामास्वामी एन., आयुक्त नवी मुंबई महापालिका

अग्निशमन विभागात कमी कर्मचारी असल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर मनुष्यबळाची गरज आहे. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली हा विभाग अत्याधुनिक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

-जगदीश पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी