नवी मुंबई : सानपाडा येथील सेक्टर १३ मधील शाह कॉम्प्लेक्स वन इमारतीच्या ए विंगच्या पहिल्या मजल्यावरील एका बंद खोलीला आग लागल्याची घटना आज (शुक्रवार, २३ मे) रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली. या आगीत खोलीतील दोन्ही बेडरूम्सना आग लागल्याने धूर पसरला आणि इमारतीत एकच खळबळ उडाली. या आगीत दोन्ही बेडरूम जळून खाक झाल्या आहेत.
सदर खोलीतील रहिवासी विजय कुमार सिंग हे कुटुंबासह गावाला गेले असल्याने आग लागल्याच्या वेळी घरात कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही बाब सुदैवाची ठरली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच वाशी अग्निशमन दल एक बंब घेऊन घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ कारवाई करत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
प्राथमिक तपासात घराचा मुख्य विद्युत प्रवाह बंद न केल्याने शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.या घटनेत खोली शेजारी गॅस पाईप लाईन असल्याने संपूर्ण इमारतीतील रहिवाशांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वेळेवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.या घटनेमुळे नवी मुंबईतील इमारतींच्या फायर ऑडिटचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.