पक्ष्यांना हुसकाविण्यासाठी आग लावल्याचा पर्यावरणप्रेमींचा आरोप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई : उरण तालुक्यातील पाणजे पाणथळ नष्ट करण्यासाठी अनेक प्रकार सुरू आहेत. गुरुवारी येथील गवताला आग लावून पक्षी हुसकाविण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पर्यावरण प्रेमींनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. यापूर्वी अशी घटना घडली आहे.

उरण तालुक्यातील एकमेव, शेवटचे उरलेले पाणथळ क्षेत्र म्हणून गणले, पाणजे, डोगरी, फंडे व बोकडवीरा या २८९ हेक्टरची जागा आहे. मात्र या पाणथळ जागेवर अनेकांचा डोळा आहे. पाणथळ बुजवून तेथे प्रकल्प उभारण्याचा विचार आहे. नवी मुंबई एसईझेडकडून यापूर्वी येथील पाणथळीत येणारे समुद्राच्या पाण्याचे पाच प्रवाह अडविण्यात आले होते. जेणकरून ही जागा सुकून ती पाणथळ नसल्याचे सांगता येईल, मात्र हा प्रकार नॅट कनेक्ट व श्री एकवीरा आई प्रतिष्ठानच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची थेट तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

गुरुवारी या ठिकाणी गवताला आग लागली. मात्र ही आग जाणूनबुजून लावल्याचा या दोन्ही संस्थांचे म्हणणे आहे. स्तलांतरित पक्ष्यांना हुसकाविण्याचा हा प्रयत्न असल्याचे नॅट कनेक्टचे संचालक बी.एन. कुमार यांनी सांगितले. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या दप्तरी तक्रार दिली असून त्यांनी पर्यावरण विभागाला चौकशीचे आदेश दिल्याचे कुमार यांनी सांगितले. त्यांनी आगीच्या ताज्या घटनेकडे उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या खारफुटी संरक्षण आणि संवर्धन समितीचेही लक्ष वेधले आहे. तर पाणथळची घातपाती कृत्याने नाश करण्याचे हे न थांबणारे सत्र चिंताजनक असल्याचे श्री. एकवीरा आई प्रतिष्ठानचे प्रमुख नंदकुमार पवार यांनी सांगितले. ऑक्टोबर ते मे या कालावधीत सुमारे ५० प्रजातींचे पक्षी या पाणथळीत येतात. त्यामुळे गांभीर्याने विचार करावा अशी मागणीही पवार यांनी केली आहे.

दहा दिवसांपेक्षा कमी कालावधीत मुख्यमंत्र्यांकडे केलेली ही तिसरी तक्रार आहे आणि या सर्व तक्रारी पर्यावरण विभागाकडे कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत. पर्यावरण विभागाने वेळीच या पाणथळ जागा वाचवण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.

बी.एन.कुमार, संचालक, नॅट कनेक्ट

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire uran panje watershed ysh
First published on: 12-11-2021 at 00:57 IST