नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर रविवारी पहिल्यांदाच व्यावसायिक विमान यशस्वीरित्या उतरविण्यात आले. ही यशस्वी चाचणी म्हणजे विमानतळ सुरू होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात असून १७ एप्रिल २०२५पासून विमानतळावरून प्रवासी तसेच मालवाहतूक सुरू करण्याचा मानस ‘सिडको’चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी बोलून दाखवला.

नवी मुंबई विमानतळावरील दोन धावपट्ट्यांपैकी एकीच्या विविध चाचण्या यापूर्वी पार पडल्या आहेत. रविवारी दुपारी १ वाजून ३९ मिनिटांनी धावपट्टीवर इंडिगो कंपनीचे ‘ए – ३२०’ विमान यशस्वीरित्या उतरले. नागरी हवाई वाहतूकीचे महासंचालक तसेच विविध तंत्रज्ञ, कर्मचाऱ्यांनीही चाचणीदरम्यान विमानातून प्रवास केला. विमानाचे स्वागत करण्यासाठी सिंघल यांच्यासह सह व्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाचे जे.के. शर्मा, प्रभात महापात्रा, मिनल वैद्या, आमदार महेश बालदी हे उपस्थित होते. ऑस्ट्रेलियन बनावटीच्या दोन अग्निशमन बंबांनी कंपनीला पाण्याचे फवारे उंचावून सलामी दिली. सिडको आणि एनएमआयएल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वैमानिक आणि अन्य कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. विमानासमोर विधिवत पुजाअर्चाही करण्यात आली. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी एनएमआयएएल कंपनीचे काही निवडक कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : लिडार सर्वेक्षण अपूर्णच; मालमत्ता विभागाच्या प्रत्यक्ष स्थळ पाहणीवरही प्रश्नचिन्ह

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापेक्षा या विमानतळाची क्षमता दुप्पट असेल. पहिल्या टप्यात वर्षाला २ कोटी प्रवासी वाहतूकीची क्षमता असेल. टर्मिनल इमारतीचे ८४ टक्के काम पुर्ण झाले असून चारही टर्मिनल स्वयंचलित यंत्रणेद्वारे एकमेकांना जोडले आहेत. आजच्या चाचणीनंतर आता विमानतळ सुरू करण्यासाठी परवानगी मागितली जाईल. त्यानंतरही विविध चाचण्या होतील.

विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, ‘सिडको’