scorecardresearch

जेलीफिशचे संकट ; जाळय़ात सापडत असल्याने मच्छीमार त्रस्त

गणेशोत्सवाच्या काळात अनेकदा मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरही विषारी जेलीफिश आढळले आहेत.

जेलीफिशचे संकट ; जाळय़ात सापडत असल्याने मच्छीमार त्रस्त
मच्छीमारांच्या बोटीमध्ये जेलीफिश

उरण: दोन महिन्यांच्या बंदीनंतर पुन्हा एकदा मासेमारी सुरू होऊन महिनाच लोटला असताना करंजा येथील एका मच्छीमारांच्या बोटीमध्ये जेलीफिश आढळून आल्याने मासेमारी करताना नुकसानीत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

साधारण सप्टेंबर महिन्यातच गणेशोत्सवाच्या काळात अनेकदा मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरही विषारी जेलीफिश आढळले आहेत.

मासेमारी व्यवसाय हा बदलत्या वातावरण व शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानाला होत असलेला विलंब यामुळे आतबट्टीचा बनू लागला आहे. त्यातच दोन महिन्यांच्या शासनाच्या मासेमारी बंदीनंतर सुरू झालेला मासेमारी व्यवसाय सुरळीत होत असताना खोल समुद्रातून मासेमारी करून आलेल्या करंजा बंदरातील एका मच्छीमाराच्या जाळय़ात मासळीऐवजी जेलीफिश आल्याची घटना घडली आहे. 

या संदर्भात रायगड जिल्हा मत्स्य व्यवसाय विभागाचे उपायुक्त सुरेश भारती यांच्याशी संपर्क साधला असता अशा प्रकारचे जेलफिश आढळल्याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जेलीफिश कसे हाताळावेत हे मच्छीमारांना माहिती असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मच्छीमारांची दमछाक

जेलीफिश ही विषारी व धोकादायक असून तिचा डंख हा वेदनादायक असतो. अशा प्रकारचे जेलीफिश जाळय़ात आल्याने भर समुद्रात मासळीचे जाळे ओढताना दमछाक होते. त्यातच जेलीफिशमुळे मासळीसाठी केलेले श्रमही वाया जात असल्याची माहिती करंजा येथील मच्छीमार विनायक पाटील यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई न्यूज ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fishermen suffering due to jellyfish caught in the net zws