पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये एक वर्षांने देशात होणाऱ्या फिफा फुटबॉल वर्ल्ड कपचे महत्त्व सांगितल्याने नवी मुंबईत १९ वर्षांखालील  खेळाडूंची फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या होणाऱ्या काही सामन्यांच्या आयोजनामुळे आयोजकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. यामुळे नवी मुंबईला जागतिक पातळीर एक मानाचे स्थान मिळणार आहे. नवी मुंबई पालिका आणि डी. वाय. पाटील अ‍ॅकाडमी या आयोजनाच्या तयारीसाठी सहा महिन्यांपासून लागली असून जूनपासून नवी मुंबईतील शेकडो शाळांमधील अडीच लाख विद्यार्थ्यांना फिफाच्या वतीने फुटबॉलचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. फिफाचे सामने देशात केवळ कोचीन तसेच गोव्यात खेळविले जाणार आहेत. महाराष्ट्रात हा मान नवी मुंबईला देण्यात आला आहे.

क्रिकेट एवढे महत्त्व फुटबॉल खेळाला दिले जात नाही, अशी खंत पंतप्रधान मोदी यांनी रविवारी मन की बात या आपल्या मासिक कार्यक्रमात व्यक्त केली. त्यामुळे १९ वर्षांखाली खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेला फिफा पुढील वर्षी आपल्या देशात खेळला जाणार आहे. यापूर्वी त्याचे केवळ युरोपमध्ये आयोजन केले जात होते. फिफाने हा मान पुढील वर्षी देशाला दिल्याचा अभिमान पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे. राज्यात नवी मुंबईतील नेरुळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये या खेळाचे काही सामने खेळले जाणार असून त्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. पालिकेने या खेळाच्या सरावासाठी नेरुळ येथील यशंवतराव चव्हाण मैदानात फिफा संघटनेच्या मार्गदर्शनानुसार दोन कोटी रुपये खर्च करून स्टेडियम तयार करण्यास घेतले आहे. त्याचवेळी वाशी येथील नवी मुंबई स्पोर्ट्स स्टेडियमदेखील उपलब्ध करून दिले जाणार आहे. याचवेळी फिफा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी फिफाच्या वतीने नवी मुंबईतील सव्वाशे शाळामध्ये फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण फिफाच्या वतीने देण्यात येणार आहे. त्यासाठी फिफाच्या मार्गदर्शनाखालीच मैदाने तयार केली जाणार आहेत. या खेळाचे थेट प्रक्षेपण १९६ देशात दाखविले जाणार असल्याने नवी मुंबईला जागतिक स्थरावर स्थान मिळणार आहे. फुटबॉलबद्दल तरुणाईमध्ये यानिमित्ताने उत्साह वाढणार आहे.. फुटबॉलबद्दल तरुणाईमध्ये यानिमित्ताने उत्साह वाढणार आहे.

नवी मुंबई पालिकेने या स्पर्धेसाठी सर्व सहकार्य करण्याचा निर्णय घेतला असून महापौर या स्पर्धेचे यजमानपद भूषविणार आहेत. फिफाच्या वतीने जूनपासून नवी मुंबईतील शाळांमध्ये जनजागृती केली जाणार असून, अडीच लाख खेळाडू तयार केले जाणार आहेत. नवी मुंबईच्या दृष्टीने ही एक अभिमानास्पद बाब आहे.

जगन्नाथ सिन्नरकर, उपायुक्त, नवी मुंबई पालिका