विषबाधेच्या घटनेनंतर आदिवासींच्या पावसाळ्यातील व्यवसायावर गंडांतर
रायगडमधील कर्जत तालुक्यात रानभाज्या खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना विषबाधा होऊन जीव गमवावा लागल्याच्या घटनेनंतर उरणमध्येही रानभाज्यांच्या मागणीत कमालीची घट झाल्याने आदिवासींच्या या व्यवसायावर गंडांतर आले आहे. अनेक आदिवासींना या भाज्या फेकून द्याव्या लागत आहेत.
पावसाळ्यात रानात येणाऱ्या नैसर्गिक रानभाज्या या पौष्टीक तसेच औषधी असतात. त्यामुळे पावसाळ्यात त्यांना मोठी मागणी असते. मध्यंतरी कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू झालेल्या संपामुळे शेतभाज्यांचे दर गगनाला भिडलेले होते. त्या वेळी अनेकांनी रानभाज्या खरेदी करणे पसंत केले होते. त्यामुळे आदिवासींनी आणलेल्या भाज्यांना मागणीही वाढलेली होती. मात्र सोमवारी रायगड जिल्ह्य़ातील कर्जत तालुक्यात रानभाज्या खाल्ल्याने त्यातून झालेल्या विषबाधेमुळे तिघांना आपली जीव गमवावा लागल्याची घटना घडली. त्यामुळे उरणमध्ये आलेल्या रानभाज्यांकडे विषबाधा होत असल्याने दुर्लक्ष करीत रानभाज्या खरेदी करणे टाळले.
रानभाज्या या पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणात येतात. या भाज्यांना अधिक मागणी असल्याने पावसाळ्यात या व्यवसायावरच संसार चालत असल्याचे मत बनाबाई नाईक या आदिवासी महिलेने व्यक्त केले. त्या या रानभाज्यांची आतुरतेने वाट पाहत असतो. औषधी गुण याचा फायदा होत असल्याने या कंठवली, टाकळा, कुडू या रानभाज्या सर्रास प्रत्येक घरातील महिला खरेदी करते.
आता शेतातील भाजी
कर्जतमधील घटनेनंतर रानभाज्या खाव्यात का असा प्रश्न पडला असल्याचे मत उरणमधील गृहिणी मनीषा घरत यांनी व्यक्त केले. त्यामुळे रानभाज्याऐवजी शेतातील भाज्याच खरेदी करून या वर्षीचा पावसाळा जाणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.