ट्रान्सहार्बर स्थानकांवर यंत्रणा उभारली. मात्र तीन वर्षांनंतर सुविधा नाही

नवी मुंबई : ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना रेल्वेने २०१९ मध्ये दिवाळीपासून वायफाय सेवेची भेट दिली होती. ऐरोली ते तुर्भे रेल्वे स्थानकात यासाठी राऊटर बसविण्यात आले होते. मात्र अडीच ते तीन वर्षे उलटली तरी रेल्वे प्रवाशांसाठी ही सेवा सुरू झालेली नाही. ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी-पनवेल मार्गावर प्रवासी वाढले आहेत. सध्या गरजेचा बनलेला मोबाइल जवळपास सर्वच प्रवाशांच्या हातात दिसतो. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक अशा अनेक समाजमाध्यमांचा मोबाइलद्वारे वापर केला जातो. यासाठी ‘नेट’ची सुविधा असणे आवश्यक आहे. प्रवाशांची करमणूक किंवा त्यांची गरज ओळखून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी ट्रान्स हार्बर मार्गावरील स्थानकांमध्ये मोफत वायफाय सुविधा सुरू करण्याचा निर्णय २०१९ मध्ये घेतला होता. एका खासगी कंपनीला हे काम दिले होते. पहिल्या टप्प्यात ऐरोली ते तुर्भे त्यानंतर दुसऱ्या  टप्प्यात जुईनगर ते खारघर रेल्वे स्थानकातही वायफाय सुविधा बसवण्यात आली होती. मात्र ऐरोली ते तुर्भे दरम्यानच्या रेल्वे स्थानकावर अद्यापही वायफाय सुविधा सुरू करण्यात आलेली नाही.

ऐरोली रेल्वे स्थानकात ऑक्टोबर २०१९ मध्ये दिवाळीपासून वाय-फायचे काम सुरू करण्यात आले होते. या  ठिकाणी यासाठीची जागा तयार करून राऊटर, वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. तांत्रिक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मात्र सुविधा अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. किमान नवीन वर्षांच्या निमित्ताने तरी संबंधित विभागाने ही सुविधा सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

अधिकारी अनभिज्ञ

वायफाय सेवा सुरू करण्याबाबतीची माहिती घेऊन सांगण्यात येईल, असे रेल्वे प्रोजेक्ट अभियंता कल्याण पाटील यांनी सांगितले तर सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रतांबे यांनी  वायफायबाबत संबंधित विभागाकडून माहिती घेण्यात येईल असे सांगितले.

डिजिटल युग असल्याने संगणक आणि मोबाइल हे खूप महत्त्वाचे ठरतात. काही वेळा मोबाइलमध्ये नेट उपलब्ध नसते, अशा वेळी रेल्वे स्थानकातील नेटचा उपयोग करता येईल. मात्र अद्आपही काही रेल्वे स्थानकावरील ही सुविधा सुरू झालेली नाही.

सागर वाघ, प्रवासी