जितेंद्र आव्हाड यांचा आरोप; वाशीमध्ये आघाडीचा मेळावा

नवी मुंबई: गणेश नाईक हे विकासासाठी नव्हे, तर स्वार्थासाठी भाजपमध्ये गेले असा आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाशीमध्ये आयोजित महाविकास आघाडीच्या मेळाव्यात आव्हाड यांनी नाईक यांच्यावर टीकास्त्र सोडले. सत्तेसाठी नाईक यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला अशी टीका आव्हाड यांनी केली.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी गणेश नाईक यांची तुलना आव्हाड यांनी केली. देश वेगळे असले तरी दोघांचे विचार लोकशाहीला मारक आहेत असा टोला त्यांनी लगावला.

नाईक यांनी सर्व पदे घरात ठेवण्यासाठीच सत्ता राबवली आहे, असाही आरोप आव्हाड यांनी यावेळी केला.  ससून डॉकची जागा रिकामी करण्याच्या सूचना संरक्षण खात्याकडून आल्या आहेत. त्यामुळे हे ससून डॉक नवी मुंबई आणण्यासाठी आघाडी सरकार प्रयत्न करणार  आहे. यासंदर्भात येत्या दहा दिवसांत बैठक घेण्यात येणार आहे, असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी  यावेळी सांगितले.

नवी मुंबईतील सत्ताधाऱ्यांना फक्त टक्केवारीमध्ये रस होता असा आरोप शिवसेना नेते विजय नाहटा यांनी मेळाव्यात केला.