|| पूनम धनावडे

महावितरणकडून परवानगीकडे दुर्लक्ष, पालिकेचाही कानाडोळा:- गॅस, पाणी, वीज, इंधनपुरवठा यासाठी शहरात अनेक ठिकाणी सुस्थितीतील रस्त्यांचे खोदकाम नेहमीच सुरू असते. मात्र खोदकामानंतर त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेकदा रस्त्यांची वाट लागलेली दिसते. यात महावितरणकडून होत असलेल्या खोदकामामुळे पालिका प्रशासनासह प्रवाशांचीही डोकेदुखी ठरत आहे. २०१४ पासून महावितरणने यासाठी फक्त पालिकेकडून एकदाच परवानगी घेतल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

वीजवाहिन्यांचा स्फोट झाल्याच्या काही गंभीर घटना शहरात घडल्या. यात खोदकामामुळे संबंधित वीजवाहिनीला धक्का पोहोचल्याने व पावसाचे पाणी शिरल्याने हे प्रकार घडत असल्याचे समोर आले असून यात महापालिका व महावितरण एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. महावितरणच्या म्हणण्यानुसार पालिका खोदकाम करीत असल्यामुळे असे प्रकार घडतात. तर पालिकेच्या म्हणण्यानुसार महावितरणच्या दुर्लक्षामुळे हे घडते.

शहरात कोणत्याही खासगी कंपनी किंवा संस्थेला काही कामानिमित्त रस्त्यांचे खोदकाम करण्यासाठी महानगरपालिकेची परवानगी घेणे बंधनकारक असते. यासाठी पालिकेला शुल्क भरणा देखील करावा लागतो. शहरात  गॅस, पाणी, वीज, दूरध्वनी, इंटरनेट, इंधन पुरवठा यासाठी खासगी तसेच शासकीय संस्थांकडून अशी खोदकामे करण्यात येतात. मात्र यासाठी पालिकेकडे परवानगी घेताना अनेकदा टाळाटाळा होत असते. यात महावितरणकडून मोठय़ा प्रमाणात दुरस्तीसाठी खोदकाम करण्यात येते. मात्र फक्त मोठय़ा कामांसाठीच परवानगी घेतली जाते. इतर कामे ही पालिका व महावितरण यांच्या सामंजस्यातून होत असतात. मात्र ही कामे केल्यानंतर खोदकाम केलेली जागा वा रस्ता सुस्थितीत करून देणे गरजेचे असताना तसे होताना दिसत नाही. नावापुरती दुरुस्ती केली जाते. फक्त खडीचा भराव टाकत खड्डे बुजविले जातात. परंतु काही कालावधीनंतर हे रस्ते उखडतात. परिणामी महापालिकेला पुन्हा त्या रस्त्यांची दुरुस्ती करावी लागते.

या संदर्भात पालिकेकडून माहिती घेतली असता, २०१४ पासून आजपर्यंत आशा २६२ व २०१८-१९ मध्ये ६१ खोदकामांना पालिकेने परवानगी दिलेली आहे. यामध्ये महानगर गॅसला २२, रिलायन्स जिओला १९, टाटा कम्युनिकेशनला ७, भारत पेट्रोलियमला ६ परवानग्या दिल्या असून महावितरणने फक्त एकच परवानगी घेतलेली आहे. असे असताना महावितरणकडून शहरात अनेक कामे सुरू असतात, ती पालिकेच्या सांमजस्यातून. मात्र त्याची डोकेदुखी पालिकेसह प्रवाशांनाही सहन करावी लागते.

महापालिका रस्ते खोदकामासाठी परवानगी देताना अनामत शुल्क घेते. एखाद्या कंपनीने रस्ते दुरुस्ती न केल्यास अनामत रकमेतून दंडवसुली करीत दुरुस्ती करण्यात येते. मात्र, लवकरच या संदर्भात महावितरणबरोबर बैठक घेणार असून प्रभाग अधिकारी, अभियंता यांना शहरातील खोदकामांची देखरेख करण्याची सूचना केली जाईल.-अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका

भूमिगत वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी महावितरण पालिकेकडून परवानगी घेऊनच खोदकाम करते. आपत्कालीन कामावेळी पालिकेला तशी माहिती दिली जाते. रस्ते दुरुस्ती कामे ही पालिकाच करते. त्यासाठी शुल्क आकारणी केली जाते. – एस बी मानकर, वरिष्ठ अभियंता, वाशी महावितरण